गोंदिया : मागील दोन महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आल्याचे दिलासादायक चित्र आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. मागील आठवडाभरापासून चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असल्याने ही बाब थोडी काळजी वाढविणारी आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी चाचण्या वाढविण्याची गरज आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी (दि.१७) १५१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १११ नमुन्याची आरटीपीसीआर तर ४० रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. जिल्ह्यात मंगळवारी कोरोना बाधित आणि कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या शून्य होती. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट ९९.२७ टक्क्यांवर पोहचला आहे. कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला असून सहा तालुके कोरोनामुक्त झाले आहे. केवळ दोन तालुक्यात प्रत्येकी एक एक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४४२४१६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी २२३८३६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१८५८० नमुन्याची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे. यापैकी ४११९६ नमुने कोरोना बाधित आढळले. तर ४०४९२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
....................
६६६७०९ नागरिकांचे लसीकरण
काेरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६६६७०९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे तर दुसरा डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे.