गोंदिया : मागील चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने कोरोना बाधितांची संख्या १७ हजार पार झाली आहे. बाधितांचा ग्राफ झपाट्याने वाढत असताना नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. हाच दुर्लक्षितपणा जिल्हावासीयांना महागात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.
जिल्ह्यात रविवारी (दि.४) ३१२ उच्चांकी कोरोना बाधितांची नोंद झाली. मागील पाच महिन्याच्या कालावधीतील रुग्ण संख्येचा हा सर्वाधिक आकडा होय आहे. तर ८८ कोराेना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी आढळलेल्या ३१२ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक १७३ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २४, गोरेगाव ६, आमगाव २६, सालेकसा ५, देवरी १४, सडक अर्जुनी २९, अर्जुनी मोरगाव ३२ आणि बाहेरील राज्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. गोंदिया तालुक्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने हा तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट झाला आहे. तर ग्रामीण भागात सुध्दा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्वांनीच कोरोना नियमांचे पालन करुन काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १०६९६० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ९३१६५ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत ९२३०३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८५०६४ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७००४ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १५३२९ बाधितांनी मात केली आहे. सद्यस्थितीत १४८३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ४९९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडूृन प्राप्त व्हायचा आहे.
..................
चार दिवसात ९४४ बाधितांची नोंद
एप्रिल महिन्यात सातत्याने कोरोना बाधितांचा आलेख उंचावत आहे. १ ते ४ एप्रिल दरम्यान तब्बल ९४४ कोरोना बाधितांची नोंद झाली असून २४३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील उद्रेकाची पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र आहे.
..............
कोरोनाचा मृत्यू दर १.१ टक्क्यावर
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने ही थोडी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्याचा कोरोना मृत्यू दर १.१ टक्के असून कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९१ टक्के आहे.
............