गोंदिया : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत आहे. त्यातच मागील पाच-सहा दिवसांपासून दररोज ६०० रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा २० हजार पार झाला असून मागील दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल चार हजार रुग्णांची भर पडली आहे. २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आरोग्य व जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकूण रुग्णांपैकी २९१३ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर ग्रामीण भागातील रुग्ण नियमांचे पालन करीत नसल्याने कोरोनाच्या संसर्गात अधिक वाढ होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात शनिवारी (दि. १०) ६१२ बाधितांची भर पडली, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. ११६ बाधितांनी कोरोनावर मात केली. मृतकांमध्ये ३३ ते ६५ वयोगटातील रुग्णांचा समावेश असून दोनजण गोंदिया आणि दोनजण तिरोडा तालुक्यातील आहे. ६१२ रुग्णांमध्ये सर्वाधिक ४१५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ४७, गोरेगाव १८, आमगाव ४, सालेकसा ३३, देवरी १४, सडक अर्जुनी ४९, अर्जुनी मोरगाव २८ आणि बाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात ११५१४१ जणांची स्वॅब नमुने तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९८५७९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १०२९७१ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ९३३८५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २००७१ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १५९०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ३९५६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १८४६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
.............
२ लाख १८२३४ चाचण्या
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ लाख १८२३४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मागील महिन्यापासून कोरोना चाचण्याची संख्या वाढविण्यात आली आहे. दररोज दोन हजारांवर चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढीचा वेगसुद्धा अधिक दिसून येत आहे.
..............
ग्रामीण भागात वाढतोय कोरोनाचा संसर्ग
शहरी भागासह ग्रामीण भागातसुद्धा झपाट्याने कोरोनाचा शिरकाव होत आहे. त्यामुळे काही गावे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाची चिंता काही प्रमाणात वाढली आहे.
........