गोंदिया : जिल्ह्यातून कोरोना आता पूर्णपणे परतीच्या मार्गावर असून, कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोनवर आली आहे. शुक्रवारी (दि.२७) कोरोनाबाधित आणि मात करणाऱ्यांची संख्या शून्य होती.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी ५८७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ४६० नमुन्यांची आरटीपीसीआर तर १२७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. आठपैकी सहा तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दोन तालुक्यांत प्रत्येकी एक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४,४५,९२३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी २,२६,८३१ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,१९,०९२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१,१९९ नमुने कोरोनाबाधित आढळले. यापैकी ४०,४९४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, तर कोरोनाचा रिकव्हरी रेट ९९.२७ टक्के आहे. कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ७ लाख ४२,९२६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
.................