गोंदिया : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून रुग्ण संख्येत थोडी वाढ झाल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ वर पोहचली. सध्या आमगाव, सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून उर्वरित पाच तालुके कोरोनामुक्त झाले आहे. रविवारी (दि.५) जिल्ह्यात एकाही कोरोना बाधिताची नोंद झाली नव्हती.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी ४३१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ३५९ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ७२ नमुन्याची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी एकही नमुना कोरोना बाधित आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४,४८,४६५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २,२८,९१२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर, २,१९,५५३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१,२०८ नमुने कोरोना बाधित आढळले. तर ४०,४९६ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात आठ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे. मागील दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन खबरदारी बाळगण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष करणे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेत नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
................
लसीकरणाची गती वाढली
कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख २९ हजार ३४७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची टक्केवारी ६४ टक्क्याच्या वर आहे.
................
सण उत्सवाच्या काळात घ्या काळजी
कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. सण आणि उत्सवांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत थोडी गर्दी वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
.............