गोंदिया : गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. रविवारी (दि. १२) जिल्ह्यात बाधित आणि मात करणाऱ्यांची संख्या शून्य होती त्यामुळे कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आठवर स्थिर होती.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने २३९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १६४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ७५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना बाधित आढळला आहे. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४,४९,८०९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २,२९,८५४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,१९,५५५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१,२११ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले तर यापैकी ४०,४९८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत केवळ ८ ॲक्टिव्ह रुग्ण आहे.
..................
लसीकरणाची ९ लाखांकडे वाटचाल
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील १२५ केंद्रावरून सध्या लसीकरण सुरू असून आतापर्यंत ८,७८,६८३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ६,६०,६५७ नागरिकांना पहिला तर २,१८,०२६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
..........
संसर्ग आटोक्यात तरी काळजी घ्या
कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात असली तरी धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे आपली सुरक्षा आपल्याच हाती हे सूृत्र आत्मसात करून सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे.
- विजय रहांगडाले, आमदार
.....................
नियमांचे काटेकोर पालन करा
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करा. सध्या सणीसुदीचे दिवस असल्याने गर्दीच्या ठिकाणी शक्य असल्यास टाळा, तसेच स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या.
- सहषराम कोरोटे, आमदार
...............
सण, उत्सव सुरळीत पार पाडा
सध्या सणासुदीचे दिवस असून हे सण उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबातील १८ वर्षावरील सर्वांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्या.
- रवींद्र अंबुले, विभागीय अध्यक्ष शिक्षक सहकार संघटना
......................