कपिल केकत
गोंदिया : जिल्ह्यात आजघडीला ४८४०५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची नोंद यामध्ये पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, आश्चर्याची बाब अशी की, यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या जेथे ३८७२२२ तेथेच दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ९६८३६ म्हणजेच लाखाच्या आतच आहे. यातून दुसऱ्या डोसची वेळ आली असूनही कित्येकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र, दोन्ही डोस घेतले तेव्हाच त्याचा फायदा असल्याने नागरिकांनी आपला दुसरा डोस घेण्याची गरज आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर करून कित्येकांना त्याच्या आप्तेष्टांपासून हिरावून नेले आहे. त्यात आता तिसऱ्या लाटेचा अंदाज लावला जात आहे. मात्र, या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आता कोरोना लस हाती असून, जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास तिसरी लाट टाळता येणार आहे. शिवाय लसींचे दोन्ही डोस घेतल्याने व्यक्ती सुरक्षित राहणार असून, कोरोना त्यांच्यावर भारी पडणार नाही, असे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यासाठी दोन्ही डोस गरजेचे आहे. त्यानुसार, जिल्ह्यात मोठ्या जोमात लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. त्यात आतापर्यंत ४८४०५८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र, आश्चर्याची बाब अशी की, यातील फक्त ९६८३८ नागरिकांनीच दुसरा डोस घेतला आहे, तर कित्येकांच्या दुसऱ्या डोसची वेळ येऊनसुद्धा ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच शरीरात ॲन्टीबॉडीज तयार होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाशी लढा देण्यासाठी आता नागरिकांनी आपला दुसरा डोस घेऊन सज्ज होण्याची गरज आहे.
---------------------------------
अर्ध्यापेक्षा जास्तीचा फरक
पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांमधील फरक बघितला असता दोन्ही गटांत अर्ध्यापेक्षा जास्त नागरिकांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसत आहे. यात १८-४४ गटाच्या लसीकरणाला २२ जूनपासून सुरुवात झाल्याने त्यांना आता दुसऱ्या डोससाठी वेळ आहे. मात्र, ४५-६० वयोगटातील १६००३८ नागरिकांनी पहिला तर फक्त ४०५२६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्याचप्रकारे ६० प्लस गटात ८८९७१ नागरिकांनी पहिला तर फक्त २९४८७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
------------------------------
१८-४४ गटाला ब्रेक लागण्याची शक्यता
१८-४४ गटातील तरुणांनी लसीकरणासाठी गर्दी केल्याने लसीचा तुटवडा असून, त्यामुळे दुसऱ्या डोसवाल्यांची अडचण होत आहे. ही बाब लक्षात घेत नागपूर येथे १८-४४ गटाला ब्रेक लावून दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे. अशात हाच प्रयोग जिल्ह्यातही राबविण्यात येणार याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे.