गोंदिया : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण, नियमांचे पालन आणि आवश्यक खबरदारी यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरली आहे. बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०३ वर आली आहे. हे चित्र कायम राहिल्यास जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात बुधवारी (दि. १६) १७ बाधितांनि कोरोनावर मात केली, तर ८ नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी ३,३९६ चाचण्या करण्यात आल्या. यात १,२२६ आरटीपीसीआर व २,१७० रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. याचे प्रमाण ०.२ टक्के आहे. जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात असून, तीन तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०३वर आली आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे जिल्हावासीयांना यानंतरही अधिक काळजीपूर्वक वागण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण १,८२,५९९ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,५७,५९२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शाेध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत १,९०,९२७ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,७०,२१८ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,०५० कोरोना बाधित आढळले असून, यापैकी ४०,२४१ जणांनी मात केली आहे. सद्यस्थितीत १०३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, २३३ नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
........
आठ दिवसात एकाही मृतकाची नोंद नाही
जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, जिल्ह्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मागील आठ दिवसात एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झाला नाही. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.
...........
३ लाख २१ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोना विरुध्दच्या लढ्यात लसीकरण हे महत्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. यांतर्गत आतापर्यंत ३ लाख २१ हजार ९८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात २ लाख ४४ हजार ४३१ नागरिकांना पहिला डोस, तर ७७,५५५ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
.............