लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मे महिन्यापासून सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सप्टेबर महिन्यात रुग्ण संख्येत वेगाने वाढ होत आहे. शुक्रवारी (दि.४) जिल्ह्यात १५३ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २०२७ वर पोहचली आहे. तर मृतकांच्या संख्येत सुध्दा वाढ होत असून गोंदिया येथील रामनगर परिसरातील एका बाधिताचा मृत्यू झाल्याने मृतकांचा आकडा २७ वर पोहचला आहे.
सप्टेबर महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट होत असल्याचे चित्र आहे. गुरूवारी सर्वाधिक १८९ रुग्ण आढळले तर शुक्रवारी १५३ नवीन कोरोना बाधितांची भर पडली. गोंदिया शहरातील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. शुक्रवारी आढळलेल्या १५३ रुग्णांमध्ये सर्वाधिक १०२ रुग्ण हे गोंदिया शहरातील आहेत. तिरोडा तालुक्यातील ६, गोरेगाव १०, आमगाव ६, सालेकसा ०, देवरी ७, सडक अर्जुनी ५, अर्जुनी मोरगाव १४ आणि बाहेरील ३ अशा एकूण १३५ कोरोना बाधितांचा समावेश आहे. गोंदिया, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने हे तिन्ही तालुके आता कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहे.
कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील बरे आहे. शुक्रवारी एकूण ५२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत १०९९ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २०२७ कोरोना बाधित आढळले आहे.सध्या स्थितीत ९०० कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहे. गोंदिया शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी आता स्वत:च पुढाकार घेत कोरोनाचीे साखळीे खंडीत करण्यासाठी आठ दिवस शहरातील बाजारपेठे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना त्यातुलनेत मात्र जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याचे चित्र आहे.
कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने केवळ गंभीर असलेल्या कोरोना बाधितांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. तर गंभीर नसलेल्या रुग्णांना घरीच आयसोलेशन करुन राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तर शहरातील पाच खासगी रुग्णालयांमध्ये सुध्दा कोरोना बाधितांवर उपचार करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे रुग्णालयांवर ताण बराच कमी झाला आहे.