गोंदिया : गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा थोडी वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ थोडी असली, तरी जिल्हावासीयांना काळजी घेण्याची गरज आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी २२४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १७८ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ४६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एक नमुना कोरोना पाॅझिटिव्ह आला. त्याचा पॉझिटिव्ह ०.४४ टक्के आहे. मागील दोन महिन्यांत कोराेनाबाधितांची संख्या बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होती. मात्र मागील दोन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना आवश्यक ती काळजी घेण्याची गरज असून, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४२६६२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २२४०१५ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २१८६२७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४११९७ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. यापैकी ४०४९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
............
लसीकरणाची सात लाखांकडे वाटचाल
कोरोनाविरुध्दच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. जिल्ह्यातील २५ केंद्रांवरुन लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ६८२६६७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.