गोंदिया : मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या सातत्याने घटत चालली असतानाच सोमवारी (दि.२४) जिल्ह्यातील आकडे पुन्हा एकदा फिरले. सोमवारी जिल्ह्यात १४९ नवीन बाधितांची भर पडली असून, १३० रुग्णांनी कोरोनावर मात केली. म्हणजेच, मात करणाऱ्यांपेक्षा बाधित जास्त आढळून आले आहेत. याचा अर्थ आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे, मृतांची संख्या कमी होत असून, ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात कहर केला आहे. मात्र, आता सुदैवाने लाट ओसरत आहे. यामुळेच बाधितांची संख्याही कमी होत असून, मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. सोमवारी (दि.२४) मात्र अचानकच १४९ बाधित आढळून आले असून, यामध्ये गोंदिया तालुक्यात ३८, तिरोडा ६, गोरेगाव १०, आमगाव १९, सालेकसा ३२, देवरी ४, सडक-अर्जुनी २६, अर्जुनी-मोरगाव १३, तर इतर राज्य जिल्ह्यातील १ रुग्ण आहे, तर १३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ४०३०६ झाली असून, यातील ३८९०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ७३१ रुग्ण क्रियाशील असून, यामध्ये गोंदिया तालुक्यात १२९, तिरोडा ६, गोरेगाव ४०, आमगाव ८५, सालेकसा १६१, देवरी ९३, सडक-अर्जुनी ७३, अर्जुनी-मोरगाव १२९, तर इतर राज्य जिल्ह्यातील १५ रुग्ण आहेत. यातील ३४८ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. विशेष म्हणजे, सोमवारच्या आकडेवारीनंतर आताही नागरिकांनी खबरदारीने वागण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.
------------------------------
२३१७ कोरोना चाचण्या
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्यांवर भर दिला जात आहे. याअंतर्गत रविवारी २३१७ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यात १७६५ आरटीपीसीआर असून, ५५२ रॅपिड अँटिजन आहेत. यातील १४९ पॉझिटिव्ह आल्या असून, १४२ संशयित आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५६१५३ आरटीपीसीआर, तर १५२१९८ रॅपिड अँटिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत.
--------------------------------
नागरिकांनी लस घ्यावी
कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लसीकरण अभियान चालविले जात आहे. लसीकरणानंतर कोरोनावर मात करता येणार असल्याने शासनाची ही धडपड सुरू आहे. मनात लसीविषयी संभ्रम न बाळगता नागरिकांनी पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.