२ हजार हेक्टरमध्ये आवत्या : शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षालोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पावसाने दर्शन दिले नाही. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांच्या रोवण्या बाकी आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २२ हजार ९०० हेक्टरमध्ये रोपवाटिका झाली असून रोवणी केवळ ११० हेक्टरमध्ये झाल्याची नोंद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार ९०० हेक्टरमध्ये रोपवाटिका घालण्यात आल्या. मात्र दमदार पावसाअभावी बांध्यात पाणी साचून राहत नाही. त्यामुळे रोवणीची कामे अनेक शेतकऱ्यांची रखडली आहेत. पाण्याशिवाय रोवणी होवूच शकत नाही. मात्र ज्यांच्याकडे शेतात पाण्याची सोय आहे, विहिरी आहेत, वॉटर पंप आहेत, अशा शेतकऱ्यांनी आपली रोवणी उरकून घेतली आहे. मात्र वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी रखडली आहे.गोंदिया तालुक्यात २५० हेक्टरमध्ये रोपवाटिका व आवत्या ५० हेक्टरमध्ये, गोरेगावमध्ये रोपवाटिका १५० हेक्टरमध्ये, सालेकसा तालुक्यात एक हजार १२० हेक्टर व आवत्या ३४६ हेक्टरमध्ये, तिरोडा तालुक्यात ५०० हेक्टरमध्ये रोपवाटिका, आमगावमध्ये एक हजार ९६० हेक्टर रोपवाटिका तर ७० हेक्टरमध्ये आवत्या, अर्जुनी-मोरगावमध्ये दोन हजार १३८ हेक्टरमध्ये रोपवाटिका तर ७५० हेक्टरमध्ये आवत्या, सडक-अर्जुनीमध्ये एक हजार ७८२ हेक्टरमध्ये रोपवाटिका तर ६०५ हेक्टरमध्ये आवत्या व देवरी तालुक्यात एक हजार ५०० हेक्टरमध्ये रोपवाटिका तर २५० हेक्टरमध्ये आवत्या घालण्यात आल्या आहेत.सध्या शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा असून रोपवाढीसाठी पाण्याची गरज आहे. त्यामुळे रखडलेल्या रोवण्या पूर्ण होतील. मात्र हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस पडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत.रोवणी केवळ ११० हेक्टरमध्ये?जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात केवळ ११० हेक्टरमध्येच रोवणी झाल्याची नोंद केली आहे. मात्र याबाबत अनेक तालुक्यातील आकडे अपडेट झालेले नाहीत. त्यामुळे रोवणी कमी झाल्याचे दिसून येत आहे. परंतु प्रत्यक्षात ज्यांच्या शेतात पाण्याची सोय आहे, त्यांची रोवणी आटोपली आहे. तर जे शेतकरी वरथेंबी पावसावर अवलंबून आहेत, त्यांची रोवणी रखडली आहे. सध्या कृषी विभागाकडे अर्जुनी-मोरगाव येथे ५ हेक्टरमध्ये व सडक-अर्जुनी तालुक्यात १०५ हेक्टरमध्ये रोवणी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात २३ हजार हेक्टरमध्ये रोपवाटिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2017 12:40 AM