लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात १९ जिल्ह्यांमध्ये ३ हजार ३५७ पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, या भरतीत ६ जिल्ह्यांमध्ये इतर मागास प्रवर्गाला(ओबीसी) एकही जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीतर्फे गुरुवारी आंबेडकर चौक ते शहराचा मुख्य बाजार आणि चौकातून मोर्चा काढण्यात आला.पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज २३ सप्टेंबरपर्यंत महाऑनलाईन पोर्टलद्वारे भरायचे आहेत. मात्र, या भरतीत ओबीसी समाजाला योग्य प्रमाणात जागा नसल्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो तरुणांनी या मोर्चात सहभाग घेऊन सरकारचा निषेध केला. तसेच सरकारने ज्या जिल्ह्यात ओबीसींची जागा नाही. त्या जिल्ह्यात होत असलेल्या भरतीत ओबीसींना सामावून घ्यावे, अन्यथा ही भरती रद्द करावी, या मुख्य मागणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविली. या आंदोलनात ओबीसी सेवा संघ, सविंधान मैत्री संघ, बहुजन एकता मंच आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.राज्यात १९ जिल्ह्यात शहर पोलीस, ग्रामीण पोलीस तसेच लोहमार्ग पोलीस, अशा विविध विभागांमध्ये ३ हजार ३५७ पोलीस शिपाई पदाची भरती केली जात आहे. त्यासाठी ऑनलाईन जाहिरात काढण्यात आली आहे. राज्यात ओबीसी प्रवर्गाला १९ टक्के आरक्षण दिले जाते. परंतु, ६ जिल्ह्यात होत असलेल्या पोलीस पदभरतीत ओबीसीला १ टक्केही जागा देण्यात आली नसल्याने हा ओबीसींवर अन्यायच आहे.बिंदू नामावलीनुसार ओबीसींना जागा मिळाव्या, यासाठी ओबीसींच्या विविध संघटनांच्यावतीने सरकारला निवेदन देण्यात आल्याची माहिती ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी दिली आहे. या वेळी अतुल सतदेवे, कैलास भेलावे, अमर वराडे, सुनील भोगांडे, शिव नागपूरे, महेंद्र कठाणे,जितेश राणे,रवी भांडारकर, राकेश टेंभरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसी तरुणांनी गोंदियात काढला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 6:00 AM
पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज २३ सप्टेंबरपर्यंत महाऑनलाईन पोर्टलद्वारे भरायचे आहेत. मात्र, या भरतीत ओबीसी समाजाला योग्य प्रमाणात जागा नसल्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो तरुणांनी या मोर्चात सहभाग घेऊन सरकारचा निषेध केला.
ठळक मुद्देसंडे अँकर । पोलीस भरतीत डावलल्याचा आरोप, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा