नोंदणीचे काम आमगावातून : सहा महिन्यांपासून सॉफ्टवेअर बंद सालेकसा : मागील सहा महिन्यांपासून सॉफ्टवेअरमध्ये बिघाड आल्यामुळे सालेकसा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कोणतीही कामे होत नाही. सध्या हे कार्यालय दिसायला टापटिप आणि केवळ शोभेची वास्तू बनून आहे. दुसरीकडे खरेदी विक्रीसंबधी कोणती नोंदणी करायची असेल तर आमगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात धाव घ्यावी लागते. तेथे नोंदणीकर्त्यांना मोठाच आर्थिक भुर्दंड बसतो.सालेकसा येथील दुय्यम निबंधक यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले, रजिस्ट्री (नोंदणी) करणारे साफ्टवेअर मागील सहा महिन्यांपासून बिघडलेले आहे. ते दुरूस्त करण्यासाठी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. परंतु ते आतापर्यंत दुरूस्त करण्यात आले नाही. लोकांची कामे थांबू नये म्हणून येथील सर्व रजिस्ट्रीची कामे आमगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात नेऊन पूर्ण केले जात आहेत. यामुळे रजिस्ट्री करणाऱ्या गरजू लोकांना मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे. एकीकडे आमगाव येथे त्याच तालुक्याचे काम मोठ्या प्रमाणात असतात. त्यावरून सालेकसा तालुक्यातील लोकांना आपल्या कामासाठी वाट पाहावी लागते. सालेकसाचे दिवसेंदिवस शहरीकरण वाढतच आहे. त्यामुळे खरेदी विक्रीचा व्यवहारसुध्दा वाढत असून येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नेहमी रजिस्ट्रीची प्रकरणे येतात. कधीकधी एकाच कामासाठी अनेकदा येण्याची पाळी सालेकसावासीयांवर येते. हा प्रकार संतापजनक असल्याचे बोलले जात आहे. वेळेवर कामे होत नसल्याने लोकांना मोठा फटका बसत आहे. (तालुका प्रतिनिधी)
दु.निबंधक कार्यालय बिनकामाचे
By admin | Published: November 21, 2015 2:17 AM