लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरालगत वाहणाऱ्या पांगोली नदीवरील जुन्याचे पुलाचे रुपातंर आता बंधाऱ्यात करण्यात आले. यामुळे पाणीसाठा वाढविणे शक्य होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होणार आहे.शहराच्या पूर्वेस वाहणाऱ्या पांगोली नदीवर गेल्या ४० वर्षांपासून पूल अस्तित्वात असून गोंदिया, चुलोद, नवरगाव, दत्तोरा व इर्री या गावांना जोडणारा हा पूल आहे. जलसंधारण विभागाने या नादुरुस्त पुलाचे पाणी साठवण बंधाऱ्यात रूपांतर केले असून या ठिकाणी बुधवारी (दि.११) जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. या नाविन्यपूर्ण कामाची प्रशंसा केली. या कामामुळे या ठिकाणी २०० स.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप, उपअभियंता सोनाली ढोके, शाखा अभियंता तुषार मानकर व शाखा अभियंता वसंत राऊत यावेळी उपस्थित होते. दगडी बांधकाम व पाईपचा वापर करून या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अन्य गावांचा संपर्क सुरळीत ठेवण्याकरिता नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले. दगडी बांधकाम असलेला जुना पूल निरुपयोगी पडून होता. जलसंधारण विभागाने जिल्हा नियोजनचा २० लाख रुपये निधी खर्चून या पुलाचे बंधाऱ्यात रूपांतर करून टाकाऊतून टिकाऊ असे नाविन्यपूर्ण काम केले. या ठिकाणी आता २०० स.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे. नदीच्या दोन्ही बाजूस असलेल्या विहिरी व बोअरवेलची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. कधी कधी शेवटच्या एक पाण्यामुळे खरीपाच्या धान पिकाचे नुकसान होते आता शाश्वत पाणी साठा निर्माण झाल्यामुळे नुकसान टाळता येणार आहे. जलसाठा तयार झाल्याने या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी सुद्धा भरपूर वाव राहणार आहे.८० हेक्टरला होणार सिंचन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी या कामाला भेट देऊन पाहणी केली. जलसंधारण विभागाने जुन्या पुलाचे बंधाऱ्यात रूपांतर करून सिंचन क्षमता वाढीसाठी उचललेले हे महत्वाचे पाऊल असल्याचे मत व्यक्त केले. या परिसरात पर्यटनाला वाव असून या अनुषंगाने विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या जलसाठ्यामुळे अंदाजे ५० हेक्टर खरीपचे व अंदाजे ३० हेक्टर रब्बीचे क्षेत्र व भाजीपाला पिकाला सिंचित करणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांचे लहान गट तयार करून या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प टाकण्यासाठी महाऊर्जा संस्थेला प्रस्ताव पाठविण्याची विनंती कृषी विभागाला पत्राद्वारे केली आहे. तसेच हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी नगर परिषदेला पत्र पाठविण्यात आल्याचे जगताप यांनी यावेळी सांगितले.
पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार - नदीपात्रात खोलीकरण झाल्याने बोटिंग करता येणे शक्य आहे. त्यामुळे हे ठिकाण कौटुंबिक सहलीसाठी विकसित करता येऊ शकते. या परिसरालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृती स्थळ असून या ठिकाणी वर्षातून दोन वेळा अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. याठिकाणी सौंदर्यीकरण केल्यास हा भाग पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकतो अशी माहिती अनंत जगताप यांनी जिल्हाधिकारी यांना दिली.