गोंदिया : मानसिक स्थिती योग्य नसल्याने येथील मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचारासाठी आलेल्या तरुणीचा रेल्वेने कटून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १५) पहाटे पाच वाजता उघडकीस आली; तर दुसरी घटना शनिवारी (दि.१६) सकाळी ६:४० वाजता घडली असून, रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये ४० वर्षे वयोगटातील युवकाचा रेल्वेने कटून मृत्यू झाला आहे. महिमा अरुण सोनी (२१, रा. वॉर्ड क्रमांक ६, कटंगी-मध्यप्रदेश) असे मृत तरुणीचे, तर जॉर्ज लुकास लॉरेन्स (४०, रा. परमात्मानगर, गोंदिया) असे मृत युवकाचे नाव आहे.
शेजारच्या मध्यप्रदेश राज्यातील ग्राम कटंगी येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील रहिवासी महिमा सोनी मानसिक आजारग्रस्त असल्याने उपचारासाठी येथील खासगी डॉक्टरकडे आपल्या आईसोबत गुरुवारी (दि. १४) आली होती. येथून गावाला जाण्यासाठी रात्री आठ वाजता ती आपल्या आईसोबत रेल्वेगाडीत चढली. फलाटावर उभी असलेल्या गाडीत चढल्यानंतर महिमाचे डोके फिरले आणि ती गाडीतून उतरली. तिची आई तिला सांभाळण्याचा प्रयत्न करीत असताना ती आईला न जुमानता गाडीतून उतरून रेल्वे रुळांकडेने पळत सुटली. तिच्या आईच्या हातात ती लागली नाही. तिच्या आईने तिला आता येईल, थोड्या वेळात येईल असे समजून काही काळ काढला; परंतु ती आली नाही. तिच्या आईने रेल्वे पोलिस ठाणे गाठून आपली मुलगी रेल्वेतून उतरून रेल्वे रूळाने गेल्याचे सांगितले. पोलिसांनी शोध घेतला; परंतु अंधारात तिचा पत्ता लागला नाही. शुक्रवारी (दि. १५) पहाटे पाच वाजता तिचा मृतदेह ढाकणीच्या रेल्वे चौकीतील खांब क्रमांक १०५७ जवळ कटलेल्या अवस्थेत असल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्याने स्टेशन मास्तरना दिली. या घटनेसंदर्भात गोंदिया रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस हवालदार रमेश माने तपास करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत शनिवारी (दि. १६) सकाळी ६:४० वाजता येथील रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये हावडाकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वेने कटून जॉर्ज लॉरेन्स या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात गोंदिया रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस हवालदार संतोष चौबे तपास करीत आहेत.