आमगाव (गाेंदिया) : तालुक्यातील कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य दाराला रात्रीच्या वेळेस कुलूप लावले असल्यामुळे एका दीड महिन्याच्या मुलाला वेळीच उपचार मिळू शकला नाही. परिणामी त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ३०) मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमगाव तालुक्यातील कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास कायरव विकास नांदणे या दीड महिन्याच्या मुलाची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर उपचार करण्यासाठी कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. मात्र, प्राथमिक केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले असल्याचे आढळताच कुटुंबीयांनी गेटबाहेरून आत असलेल्या कर्मचाऱ्यांना रात्री एक ते दीड वाजेपर्यंत आवाज दिला. मात्र, कुणीही कर्मचारी बाहेर आला नाही. त्यानंतर त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या घरी जाऊन बोलाविण्यात आले व संबंधित डॉक्टरला बोलाविण्यात आले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
डॉक्टर आल्यावर बाळाची तपासणी केली असता तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. केवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले असल्याने आणि वेळीच उपचार होऊ न शकल्याने दीड महिन्याच्या बाळाला प्राणास मुकावे लागले. बाळाला डॉक्टरने मृत घोषित करताच त्या मातेने हंबरडा फोडला. बाळाला वाचविण्यासाठी त्या मातेने आणि कुटुंबीयांनी दीड तास धडपड केली. मात्र, उपचाराअभावीच बाळ दगावल्याने त्यांची ही सर्व धडपड व्यर्थ गेली. गावकऱ्यांना हा सर्व प्रकार कळताच त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रवेशद्वाराला कुलूप कशासाठी ?
प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना रात्री-बेरात्री केव्हाही उपचारासाठी आणले जाऊ शकते. मग प्रवेशद्वाराला कुलूप लावून ठेवण्याचे कारण काय, प्रवेशद्वाराला कुलूप लावण्याऐवजी चौकीदाराची नियुक्ती का केली जात नाही? बाळाच्या मृत्यूस केवळ कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बाळाच्या कुटुंबीयांनी केली आहे.