गोंदिया : वाघिणीसह तिचे ३ बछडे रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेने धडक दिल्याने त्यातील एक बछडा ठार झाला होता. या अपघातात मरण पावलेल्या बछड्याचा एक पाय रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांनी नेला होता. या प्रकरणात त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि.८) रात्रीच करण्यात आली.
सोमवारी (दि.८) सकाळी सुमारे ८ वाजताच्या दरम्यान सौंदडकडून गोंदियाच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहक रेल्वेगाडीने रेल्वेचे पोल क्रमांक १०२५-८ व ९ दरम्यान वाघास धडक दिल्याची माहिती पिंडकेपार सहवनक्षेत्राचे क्षेत्र सहायक डी.एल.धुर्वे यांना रेल्वे फाटकच्या स्वीच मॅनने दिली होती. या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळी गेले असताना त्या वाघाच्या बछड्याचा एक पाय गायब होता. तो पाय दोन रेल्वे कर्मचाऱ्यांनी नेला होता. वनाधिकाऱ्यांनी तो पाय त्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून हस्तगत केला आहे. ताब्यात घेतलेला एक कर्मचारी गोंदिया तालुक्यातील आहे.
पिंडकेपार सहवनक्षेत्रातील मुंडीपार बिटात घडलेला हा प्रकार नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राचा भाग आहे. घटनास्थळी मृत वाघ रेल्वे रुळावर पडून होता. मृत वाघाचे वय अंदाजे १२ ते १५ महीने असून तो नर जातीचा आहे. मृत वाघाचा पुढचा उजवा पाय तुटलेला होता. तो पाय घटना स्थळावर मिळून आला नसल्याने त्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने श्वान पथकाची मदत घेतली. वनविभागाने गहाळ पायाचा शोध घेण्याकरीता सर्व संशयीतांवर नजर ठेवली होती. त्यानंतर घटना घडली त्याच दिवशी वनविभाग गोंदिया व गोरेगाव वनपरीक्षेत्राच्या चमूने धडक कारवाई करुन रेल्वेचे कर्मचारी चाबीदार पुरुषोत्तम तुलाराम काळसर्पे यांना त्यांच्या घरी दांडेगाव (एकोडी) व हरिप्रसाद मिना (रा.गोंगले) यांना रात्री १२ वाजता ताब्यात घेऊन विचारपूस केली. यात, गायब असलेला वाघाचा तो पाय त्यांच्या जवळून हस्तगत करण्यात वनविभागाला यश आले आहे.