गोंदिया : सुंदर अक्षर हे विद्येचे आवश्यक अंग आहे. सुंदर अक्षरामुळे विद्यार्थ्यांची ओळख होते; परंतु कोरोनामुळे आता विद्यार्थ्यांची लिहिण्याची गती कमी झाली आहे. हस्ताक्षर सुंदर निघत होते त्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाईनचाच सराव झाल्याने त्यांचे हस्ताक्षर बिघडले आहे. लिहिण्याला गतीही नाही. विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. पेनचा वापर कमीत कमी झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी पेनला हात देखील लावले नाही. ज्यांचे सुबक अक्षर निघत होते ते आता आधीच्या तुलनेत कमी सुबक अक्षर निघत आहेत. आधी तासन् तास लिहिले तरी विद्यार्थ्यांना काहीच वाटत नव्हते. आता थोडा वेळही लिहिले तरी त्यांचे हात दुखायला लागत आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना गृहपाठ मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची लिखाण करण्याची सवय तुटत चालली आहे. त्यासाठी घरातच विद्यार्थ्यांनी सराव करावा असे तज्ज्ञांचे मत आहे.
...
विद्यार्थ्यांनो हे करा
१) विद्यार्थ्यांनी आपले लिखाण चांगले करण्यासाठी दररोज नियमित एक ते दोन पान लेखन करावे. हस्ताक्षर चांगले व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत.
२) वर्णाक्षरे, मुळाक्षरे यांचा नियमित सराव करणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांची मुळाक्षरे सुबक येतील. त्यांच्या लिखाणात सुबकपणा येईल.
३) नियमित लिखाणामुळे विद्यार्थ्यांची लिहिण्याची गती वाढेल आणि ही गती परीक्षेच्या वेळी कामात येईल. परीक्षेच्या वेळी कमी वेळात सर्व प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी गती असणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित सराव करावा.
.......
कोट
ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे लिखाण कमी झाले. आधी ग्रामीण भागातील विद्यार्थी लिखाण करत होता ते शिक्षकांच्या समोर हे व्हायचे. परंतु ऑनलाईनमुळे आता लिखाण होत नाही त्यामुळे मुलांची लिहिण्याची गती मंदावली आहे.
ओमप्रकाश पटले, जि.प. शाळा कासा
....
कोट
ऑनलाईन क्लासमुळे लिहिण्याचा सराव कमी झाला. जास्त लिखाणामुळे अक्षर दुरूस्ती होते, अक्षर सुबक निघतात. ऑनलाईन शिक्षणामुळे हस्ताक्षर काढले जात नाही. अक्षर सुंदर व्हावेत यासाठी लक्षही दिले जात नाही. ऑनलाईन शिक्षणामुळे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
-एस. एम. पंचभाई जि. प. शाळा बेलाटी बुजरूक
.....
कोट पालक
ऑनलाईन शिक्षणामुळे संपूर्ण घोळ होत आहे. मुलांच्या हातात पेन दिसत नाही. कव्हरेजची समस्या असल्याने ऑनलाईन शिक्षणही बरोबर मिळत नाही. शिक्षकांचा धाक किंवा गृहपाठ नसल्याने आमची मुले लिखाण करताना दिसत नाहीत.
दिनदयाल महारवाडे, पालक बोथली.
...........
कोट पालक
कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. पण लिहीण्याची मुलांची सवय तुटत चालली आहे. शाळेतून घरी आल्यावरही आमची मुले उद्या शिक्षक विचारणार या भितीने लिखाण करीत होते. परंतु ऑनलाईन शिक्षणामुळे कधीच लिहीतांना दिसत नाही.
- अनिल पाऊलझगडे, पालक किडंगीपार