देवरी : आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत आदिवासी सहकारी संस्थेतर्फे सुरू असलेल्या रब्बी हंगाम २०२०-२१ मधील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे धान खरेदी पूर्ण झाली नाही. धान खरेदीची मुदत या महिन्यात संपत आहे; तरी रब्बी हंगामामधील शेतकऱ्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन व धानखरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्याकडे केली आहे.
आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय देवरीअंतर्गत आदिवासी सहकारी संस्थेतर्फे सुरू असलेल्या रब्बी हंगाम २०२०-२१ मधील धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत एकूण ५,१९५ शेतकऱ्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाले आहे; परंतु मागील हंगामाची तुलना केली तर हंगाम २०१९-२० या वर्षात रब्बी हंगामात एकूण ७४६५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आपले धान खरेदी केंद्रावर विक्री केली. त्यानुसार हंगाम २०२०-२१ व हंगाम २०१९-२० या दोन्ही हंगामांच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या बघता एकूण २२७० शेतकऱ्यांची तफावत दिसत आहे. तरी २०२१-२२ हंगामात कोणताही शेतकरी हमीभावाच्या लाभापासून वंचित राहू नये आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, या दृष्टीने रब्बी धान खरेदी २०२०-२१ या हंगामात शेतकऱ्यांची ऑनलाईन रजिस्ट्रेशन व धान खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली. यावेळी आदिवासी विकासमंत्र्यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.