गोंदिया : ऑनलाइन पेमेंटमुळे नक्कीच सोय होत असली तरी आता त्याचा गैरवापर करून लोकांना गंडविले जात असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याचीच प्रचिती शहरातील रेलटोली परिसरातील वृद्धासोबत घडलेल्या प्रकारातून आली आहे. त्यांना रिमोट आयडी देऊन खात्यातून एक लाख १८ हजार ४९५ रुपये काढून घेण्यात आले. २८ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला.
सविस्तर असे की, रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत रेलटोली परिसरातील रहिवासी फिर्यादी संतोष नरेंद्रसिंग प्रमर (६२) यांनी त्यांच्या मोबाइलद्वारे २५ डिसेंबर रोजी स्नॅपडिल ॲपवर ऑनलाइन पेमेंट करून ५०० रुपयांचे कपडे खरेदी केले. मात्र, त्यांना ते कपडे आवडले नसल्याने त्यांनी परत करण्यासाठी २७ डिसेंबर रोजी आपल्या मोबाइलने गुगलवरून स्नॅपडिलच्या कस्टमर केअरचा क्रमांक शोधून त्यावर संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र, २८ डिसेंबर रोजी सकाळी ११:३० वाजेदरम्यान त्यांना ७०५७९४४१४५ या क्रमांकावरून फोन आला व तुमची तक्रार मिळाली असून, तुम्हाला पैसे परत करायचे आहे, असे बोलून त्या व्यक्तीने एक रिमोट आयडी दिली. तसेच त्या आयडीच्या मदतीने आरोपीने फिर्यादीच्या आईच्या बँक ऑफ बडोदामधील खात्यातून ७२ हजार ९९८ रुपये, भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून २० हजार ५०१ रुपये व मोठ्या बहिणीच्या खात्यातून २४ हजार ९९६ रुपये असे एकूण एक लाख १८ हजार ४९५ रुपये ऑनलाइन ट्रानस्फर करून घेतले. फिर्यादीच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी १७ जानेवारी रोजी भादंवि कलम ४२०, सहकलम ६६, ६६(सी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.