पालिकेच्या प्राथमिक शाळा : काही दिवसांत आणखी वाढीची शक्यता कपिल केकत। लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेच्या शाळांमागे लागलेले ग्रहण यंदाही काही सुटल्याचे दिसून येत नाही. मात्र पालिकेच्या शाळांचा दर्जा वाढावा यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे फलित काही प्रमाणात दिसू लागले आहे. पाहिजे त्या प्रमाणात यात यश लाभलेले नसून पालिकेच्या शाळांतील पटसंख्या अपेक्षित प्रमाणात वाढलेली नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. कारण मागील वर्षी ५२४ विद्यार्थी संख्या असलेल्या पालिकेच्या प्राथमिक शाळांत सध्यातरी ५३४ विद्यार्थ्यांची नोंद पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. यावरून या सत्रात फक्त १० विद्यार्थ्यांची भर पडल्याचे दिसते. नवीन शैक्षणिक सत्रात पालिकेच्या प्राथमिक शाळांत (वर्ग १ ते ४) फक्त ५३४ विद्यार्थ्यांची नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. असे असतानाही या नाममात्र विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या १६ शाळा सुरू आहेत. एका खाजगी शाळेत हजारांवर विद्यार्थी असताना पालिकेच्या १६ शाळांत ५३४ विद्यार्थी असणे ही आश्चर्याची व तेवढीच चिंतनाची बाब आहे. घटत चाललेल्या पटसंख्येमुळे मात्र पालिकेच्या या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आजघडीला शहरातील खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ झाल्या आहेत. यात निकाल म्हणा की, पटसंख्या दोन्ही बाबतीत पालिकेच्या शाळा माघारलेल्या आहेत. खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याची वेळ येत असताना मात्र पालिकेच्या शाळांत आता शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी घरोघरी जाण्याची पाळी आली आहे.एकतर पालिकेच्या शाळांचा घसरत चाललेला दर्जा, त्यात निकालांत पालिकेची एकही शाळा १०० टक्के निकाल देत नसल्याने पालकांचाही कल आता खाजगी शाळांकडे वाढत चालल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, कधी विद्यार्थ्यांनी खचाखच भरणाऱ्या पालिकेच्या शाळा आता ओस पडत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून पालिकेच्या शाळांना पटसंख्या गळतीचा हा रोग जडला आहे. मात्र यावर तोडगा काढण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. यंदा शिक्षण समिती सभपतींनी पालिकेच्या शाळांची ही स्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न केलेत. काही नवे प्रयोगही यासाठी अंमलात आणलेत. त्याचा फायदा असा म्हणता येईल की, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १० विद्यार्थ्यांची भर पडल्याची दिसत आहे.विशेष म्हणजे मिळालेली आकडेवारी ही बाब स्पष्ट करीत आहे. आता हे सत्र सुरू झाले असून ही पक्की संख्या नसून अद्याप प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढणार असे अपेक्षित आहे. शिक्षकांचे इतरत्र समायोजन पालिकेच्या सिव्हील लाईन्स मराठी शाळेत फक्त दोनच विद्यार्थी होते. यंदा एकही विद्यार्थी या शाळेत नाही. त्यामुळे येथे असलेल्या शिक्षकाला इंजिन शेड शाळेत पाठविण्यात आले आहे. इंजिन शेड शाळेतील शिक्षिकेची सेवानिवृत्ती झाल्याने त्यांची जागा अशाप्रकारे भरण्यात आली आहे. असाच प्रयोग हिंदी टाऊन शाळेत करण्यात आला आहे. हिंदी टाऊन शाळेत मागील वर्षी १ विद्यार्थी होता व त्यामुळे येथील विद्यार्थी मालवीय शाळेत पाठविण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार येथील शिक्षकही मालवीय शाळेत पाठविण्यात आल्याची माहिती आहे. यावरून सिव्हील लाईन्स मराठी व हिंदी टाऊन शाळा आता बंदच पडल्या असेच म्हणावे लागेल. मात्र यंदा काही विद्यार्थी आल्यास त्यावर काही तोडगा काढला जाऊ शकतो. अध्यक्ष व सभापतींच्या प्रभागातच धक्का पालिकेच्या शाळांतील पटसंख्या अपेक्षीत होती तशी वाढली नाही. यातही अध्यक्ष व सभापतींच्या प्रभागातच मात्र धक्का बसला आहे. त्याचे असे की पालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, सिव्हील लाईन्स परिसरातील मराठी इंजिन शेड शाळेत मागील वर्षी ३१ विद्यार्थ्यांची नोंद असून यंदा या शाळेत २४ विद्यार्थ्यांची नोंद आहे. तर इंजिन शेड हिंदी शाळेत मागील वर्षी ३५ विद्यार्थ्यांची नोंद असून यंदा येथे २९ विद्याथ्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे सिव्हील लाईन्स मराठी शाळेत मागील २ विद्यार्थ्यांची नोंद होती. यंदा मात्र या शाळेत एकही विद्यार्थी नसल्याची नोंद आहे. यातून अध्यक्ष व सभापतींच्या रहिवासी भागात पटसंख्या वाढीच्या मोहिमेला धक्का बसला असल्याचे सध्या तरी म्हणता येईल.
फक्त १० विद्यार्थ्यांची भर
By admin | Published: June 30, 2017 1:25 AM