लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ केवळ एक रुपयात मिळणार असून, १५ जुलैपर्यंत नोंदणी करून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. यासाठी आता केवळ १२ दिवसांचा कालावधी शिल्लक असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी महेंद्र दिहारे यांनी केले आहे. तालुक्यात बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर केली जाते. त्यातही पावसाचे प्रमाण, कीडरोग इतर आपत्तीमुळे शेतकऱ्याचे नुकसान होते. प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिल्यास त्यांना नुकसान भरपाई देता यावी, यासाठी योजना सुरू केली आहे.
असे आहे योजनेचे स्वरुप■ खरीप व रब्बी हंगामात जोखमीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता येतो. प्रतिकूल हवामानामुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकाच्या हवामानामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान, पीक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, क्षेत्र जलमय होणे, दुष्काळ पावसातील खंड, कीड व रोग इत्यादीमुळे उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणामुळे पिकाचे होणारे काढणीपश्चात नुकसान.
...या आहेत अटी शर्ती■ शेतकऱ्याचा सातबारा त्याच्या नावावर असावा, आपत्तीमध्ये नुकसान झाल्यावर सर्वेक्षण केले जाईल. सक्षम अधिकाऱ्याचे तसे प्रमाणपत्र सादर केल्यावर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. शेतकऱ्याने विविध पद्धतीने पीक विमा काढलेला असावा. नुकसान पश्चात क्राप इन्शुरन्स या अॅपवर नुकसानीबाबत तक्रार करावी. त्यानंतर विमा प्रतिनिधी पाहणी करून पुढील कार्यवाही करतील. बैंक, सामूहिक सेवा केंद्र, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या मार्फत नोंदणी करता येईल.