गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आला असून, जिल्हा लवकरच पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीत १५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि. १४) १३९८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १२१५ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर १८२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी १ नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.०७ टक्के आहे. मागील दीड महिन्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २०७५८७ नमुन्यांची चाचची करण्यात आली. त्यापैकी १८२१७५ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २२०२९१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १९९२०८ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सद्य:स्थितीत १५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ३२१ नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..........
कोरोनाचा रिकव्हरी रेट ९८.२६ टक्के
कोरोना बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा रिकव्हरी रेट सातत्याने वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९८.२६ टक्के आहे, तर राज्याच्या रिकव्हरी रेट ९६.२१ टक्के आहे. त्यामुळे राज्यापेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सरस आहे.
..................
लसीकरणाचा पाच लाखांचा टप्पा पूर्ण
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासनाकडून सुद्धा लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५०६०४९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ४०३६६० नागरिकांना पहिला डोस, तर १०२३८९ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
................