कपिल केकत ल्ल गोंदियाजिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या १०४ योजनांमधील ९८ योजना अद्याप ‘करंट’च्या प्रतीक्षेत आहेत. वास्तविक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे फक्त ३९ योजनांचेच अर्ज (अ-१) भरण्यात आले असून २५ योजनांसाठीच डिमांड भरण्यात आली आहे. त्यातही महावितरणला १०२ योजनांची माहिती देण्यात आली आहे. अशात महावितरणने या सर्व योजनांची वीज जोडणी कशी करायची, असा सवाल आता महावितरणकडून केला जात आहे.दरवर्षी उन्हाळ््यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमुळे नागरिकांची चांगलीच फजिती होते. यावर कायमचा तोडगा काढता यावा यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत १०४ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे काम हाती घेतले होते. फेब्रवारी २०१५ पर्यंत या १०४ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. योजनांचे काम पूर्ण झाल्याने विभागाने यातील ५२ वीज वितरण कंपनीकडे वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली होती. तर वीज जोडणी अभावी ९८ योजना पांढरा हत्ती ठरत आहेत. हे जरी सत्य असले तरी, महावितरणकडे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने फक्त १०२ योजनांचीच यादी दिली आहे. यात गोंदिया विभागात ५९ तर देवरी विभागात ४३ अशा एकूण १०२ योजनांची नोंद आहे. शिवाय ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजनांचे बांधकाम करण्यात आले असले तरिही आतापर्यंत फक्त ३९ योजनांचेच अर्ज (अ-१) महावितरणकडे देण्यात आलेले आहेत. यातही २५ योजनांचे डिमांड भरण्यात आले आहेत. म्हणजेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून अद्याप ६३ योजनांचे अर्ज महावितरणकडे देण्यात आलेले नसल्याची माहिती आहे. यात गोंदिया विभागातील २९ तर देरवरी विभागातील ३४ योजनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महावितरणकडे अर्ज करून योजनांसाठी डिमांड भरण्यात आलीच नाही. अशात महावितरण कसे काय या पाणी पुरवठा योजनांना जोडणी देणार असा सवाल महावितरणकडून केला जात आहे. यातून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजनांच्या वीज कनेक्शनसाठी कुठेतरी दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट दिसून येते. फेब्रुवारीतच या योजनांचे काम झाल्यावर आता वर्षभर होत असताना साधे अर्जही भरण्यात आले नाहीत. अशात या योजना कधी सुरू होणार व या गावांतील नागरिकांनी यंदाच्या उन्हाळ््यातही पाण्यासाठी भटकावे लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
महावितरणकडे आले फक्त ३९ अर्ज
By admin | Published: December 08, 2015 2:10 AM