गोंदिया : मागील वर्षी सुरू झालेल्या कोरोना प्रकोपावर मात करण्यासाठी नववर्षात लस हाती आली. देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली व त्यात आपला जीव धोक्यात घालून रूग्णांचा जीव वाचविणाऱ्या आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर्सना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरूच आहे. लसीमुळे आपण सुरक्षित राहू शकतो ही बाब शासनाकडून निदर्शनास आणून दिली जात असतानाच खुद्द आरोग्य कर्मचारीच कोरोनाची लस घेत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील आकडेवारी बघता १०५८० आरोग्य कर्मचाऱ्यांतील १०२८० आरोग्य कर्मचाऱ्यांनीच आतापर्यंत लस घेतली असून ३०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतलीच नसल्याचे दिसून येत आहे. यातून उपचार करणारेच जर लस घेत नसतील तर कोरोनाची तिसरी लाट कशी रोखली जाणार असा प्रश्न पडत आहे.
-------------------------
- हेल्थ केअर वर्कर्स- १०५८०
पहिला डोस घेतलेले- १०२८०
दोन्ही डोस घेतलेल - ६१३४
एकही डोस न घेतलेले - ३००
फ्रंटलाईन वर्कर्स- २४३१२
पहिला डोस घेतलेले- २४३१२
दोन्ही डोस घेतलेले- १२६१४
एकही डोस न घेतलेले - ००
----------------------------------
लसीकरणाबाबत उदासीनता का ?
- जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असून आजघडीला शासकीय रूग्णालयात एकही बाधित भर्ती नाही. यामुळे कोरोनाला घेऊन नागरिकांच्या मनातील भीती आता कमी झाली असून अशात कोरोनाची लस घेण्याची गरज नाही असा गैरसमज निर्माण होत आहे.
- ग्रामीण भागात सध्या शेतीची कामे सुरू असून त्यात कोरोनाची लस घेतल्यास ताप आला तर २-३ दिवस कामावर जाता येणार नाही. त्यामुळे तेवढी रोजी बुडणार यामुळेही नागरिक कोरोना लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे.
- काही नागरिकांमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोना होते अशी भीती किंवा अंधश्रद्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे लसीकरणाची सोय असूनही ते लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. शिवाय घरातील तरूण बाहेर जात असल्याने म्हाताऱ्यांना नेता येत असून त्यांचे लसीकरण राहिले आहे.
--------------------------
कोट
कोरोना संसर्गजन्य असतानाही कित्येक नागरिक रूग्णांना भेटण्यासाठी रूग्णालयात येतात. यामुळे ‘भरती असलेल्या रूग्णांची भेट टाळा व कोरोना प्रादुर्भाव टाळा’. शिवाय तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी नागरिकांनी लसीकरणासाठी स्वत: पुढे यावे
व स्वत: सह आपल्या कुटुंबाला सुरक्षित करावे. - डॉ. नरेश तिरपुडे
अधिष्ठाता, गोंदिया वैद्यकीय महाविद्यालय.