लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सुरक्षा सानुग्रह योजनेंतर्गत जिल्ह्यात एप्रिल २०२४ ते आतापर्यंत १२४ जणांचे प्रस्ताव आले. त्यापैकी ३२ प्रस्ताव मंजूर झाले असून, ६३ लाख रुपये सानुग्रह अनुदान शेतकरी वारसाला मिळाले आहे. या योजनेमुळे शेतकरी वारसांना सुविधा निर्माण होऊन शासन मदत मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.
शेतात काम करीत असताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का लागणे आदींसह नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ता अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामध्ये बऱ्याच वेळा शेतकऱ्याचा मृत्यू होतो, तसेच अपंगत्व येते.
घरातील कर्त्या व्यक्तीच्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. मात्र, विविध कारणांमुळे प्रस्ताव मान्य होत नाहीत. कागदपत्रांची पूर्तता नसणे हे यातील मुख्य कारण असते. अर्जाच्या तुलनेत कमी प्रमाणात अर्ज मंजूर केले जात असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
किती प्रकरणे प्रलंबित ? गोपीनाथ मुंडे अपघात योजनेचे ८३ प्रस्ताव प्रलंबित असून, कागदपत्राची पूर्तता करणे सुरू आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यास वरिष्ठ स्तरावर पाठवून ते अर्ज मंजूर झाल्यास मदत मिळते.
वर्षभरात किती जणांना लाभ? एप्रिल २०२४ ते आतापर्यंत ३२ जणांच्या कुटुंबीयांना ६३ लाख रुपये सानुग्रह मदत शासनाकडून देण्यात आली आहे.
अर्जात या त्रुट्या निघाल्या घटना घडल्यास त्या घटनेचा पंचनामा, इन्केवेस्ट पंचनामा, पोलिस समरी, एसडीएम समरी असे विविध कागदपत्रांअभावी अर्ज प्रलंबित राहत असल्ल्याने अडचण होत आहे.
कोणाला मिळतो लाभ? शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू होतो. अंगावर वीज पडून मृत्यू होणे, नैसर्गिक आपत्ती, पूर, सर्पदंश, विचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. यात शेतकरी कुटुंबाचा आधार जातो. अशावेळी मृत शेतकऱ्याच्या वारसांना ही मदत मिळते.
२ लाख अपघात झाल्यास महाराष्ट्र सरकारने ही योजना २००५-०६ सुरू केली. तेव्हा त्याचे नाव 'शेतकरी जनता अपघात विमा योजना' असे होते, ते बदलून 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना' असे करण्यात आले. २००९-१० मध्ये या योजनेसाठी एक लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता. पुढे या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्षात घेता २०१५-१६ मध्ये ही रक्कम वाढवून दोन लाख एवढी करण्यात आली.
अर्ज कोठे कराल? या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात सर्व आवश्यक कागदपत्रासह तालुका कृषी अधिकारी किवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागतो.