पोलीस शिपाईपदाच्या ३९ जागा : ३८७९ जणांनी दिली शारीरिक क्षमता चाचणी गोंदिया : जिल्ह्याची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया २२ मार्चपासून सुरू झाली. अनुकंपावरील राखीव जागा वगळता उर्वरित ३९ जागांसाठी तब्बल ६ हजार ९५ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ७८१ महिला व ३०९८ पुरूषांची मिळून ३ हजार ८७९ ुउमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. त्यातून ६०० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडण्यात आले आहेत. प्रभारी पोलीस अधीक्षक राकेशचंद्र कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात सदर भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. अत्यंत कडक शिस्तीत ही भरती प्रक्रिया पारदर्शतेने होत आहे. ३९ जागांपैकी ११ जागा महिलांसाठी असून या जागांसाठी १ हजार २४८ महिलांनी अर्ज केले आहे. त्यातील ७८१ महिलांनी शारिरिक चाचणी दिली असून ४६७ महिला उमेदार गैरहजर किंवा त्यांना तृट्यांअभावी चाचणी देता आली नाही. २८ पुरूषांच्या जागांसाठी ४ हजार ८४७ पुरूषांनी अर्ज केले होते. त्यातील ३ हजार ९८ पुरूषांनी शारिरिकक चाचणी दिली तर १ हजार ७४९ उमेदवार गैरहजर किंवा त्यांना तृट्यांअभावी चाचणी देता आली नाही. गोंदिया जिल्ह्यातील ३९ जागांसाठी लेखी परीक्षेसाठी एका जागे मागे १५ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे. गुणानुक्रमे गुणवत्ता यादीत असलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी दिली.सदर भरतीवर करडी नजर ठेवण्यासाठी २६ सीसीटीव्ही कॅमेरे तर २२ व्हिडीओ कॅमेरे बसविले होते. आक्षेप घेणाऱ्यांचे समाधान करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी) एक पोलीस निलंबित, तर दुसऱ्याला दंड गोंदिया जिल्हा पोलीस भरतीसंदर्भात कडक शिस्त ठेवण्यासाठी भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना भरतीच्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती. परंतु या भरतीत कॅमेरा सांभाळण्यासाठी ठेवण्यात आलेले नवेगावबांध येथील पोलीस कर्मचारी अनिल उके (बक्कल क्र.२००१) हे भरतीदरम्यान मोबाईलवर बोलत असल्याने त्यांना पोलीस अधीक्षक राकेशचंद्र कलासागर यांनी निलंबित केले. दुसरा कर्मचारी रावणवाडी पोलीस ठाण्यातील असून श्रीकांत नागपुरे नावाच्या या कर्मचाऱ्याला मोबाईवरूनच ५ हजार रूपये दंड ठोठावला आहे. कडक शिस्तीत भरती प्रक्रिया होत असून चुकी करणाऱ्यांना माफी नाही, असा संदेश पोलीस अधीक्षकांनी या भरती प्रक्रियेत केलेल्या कारवाईतून दिला.
अवघे ६०० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र
By admin | Published: April 02, 2017 1:06 AM