गोंदिया : गावातील शाळेलगत असलेल्या तलावात बुडून दोन चिमुकल्या चुलत बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. आयुष्य राजेंद्र उईके (३) व निशा जितेंद्र उईके (५) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या चुलत बहीण-भावाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार सध्या धान कापणीचा हंगाम सुरू असून आयुष्य आणि निशाचे कुटुंबीय धान कापणीसाठी शुक्रवारी सकाळीच शेतावर गेले होते. घरी आजोबा आणि दोन बहीण-भाऊ हेच होते. खेळता खेळता आयुष्य आणि निशा हे दोघेही टायर चालवीत चालवीत गाव तलावाकडे गेले. दरम्यान उतार भाग असल्याने आयुष्यचा टायर तलावातील पाण्यात गेला. तो काढण्यासाठी निशा पाण्यात गेली आणि तिच्या पाठोपाठ आयुष्यसुद्धा गेल्याचे बोलल्या जाते. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन्ही चिमुकल्या बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
बराच उशीर होऊन दोघेही चिमुकले घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. गावातील काही लोकांनी दोघाही बहीण-भावाला टायर चालवीत चालवीत तलावाकडे जाताना पाहिल्याचे सांगितले. तर तलावात टायर आढळले. त्यामुळे कुटुंबीयांनी तलावात शोध घेतला असता दोन्ही चिमुकले मृतावस्थेत आढळले. पोलीस पाटील राऊत यांनी घटनेची माहिती दवनीवाडा पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक भोसले ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. तलावातून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.