गोंदिया : आपण दिलेल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचविता येऊ शकतो, यामुळेच रक्तदानाला ‘जीवदान’ म्हटले जाते. मात्र मागील वर्षी कोरोनामुळे रक्तदात्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता व त्यामुळे रक्तदानाअभावी रक्त केंद्रातील रक्तसंकलन संकटात आले होते. परिणामी, रक्ताची गरज असलेल्या रुग्णाचा जीव वाचविणे अशक्य झाले होते. मात्र कोरोना व रक्तदानाचा काहीच संबंध नसल्याचे तज्ज्ञांनी समजावून सांगितल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाली. असे असतानाच आता कोरोनाची लस तयार झाली असून अवघ्या देशात जोमात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक वाढत असल्याने लसीकरणावर जोर दिला जात आहे. विशेष म्हणजे, शासनाने ४५ वर्षांपेक्षा पुढील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिली असून, त्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. येथे रक्तदान करणारे तरुण व युवकच मोठ्या संख्येत असल्याने लसीकरणामुळे त्यांची संख्या घटत चालली आहे. लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नाही, असे निर्देश आहेत. परिणामी, रक्तदात्यांची संख्या घटत चालली आहे. याचा परिणाम रक्त केंद्रांवर होत आहे. शनिवारी (दि. ३) येथील शासकीय रक्त केंद्रात आठवडाभर पुरेल एवढाच साठा उपलब्ध होता. अशात रक्तदात्यांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याची गरज असून तसे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे व रक्त केंद्राचे जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे यांनी केले आहे.
--------------------------
आठवडाभराचाच साठा उपलब्ध
येथील शासकीय रक्तकेंद्रावरच जिल्ह्यासह लगतच्या राज्यांतून येणाऱ्या रुग्णांची दारोमदार आहे. मात्र लसीकरण वेग घेत असल्याने रक्तदात्यांची संख्या घटत चालली आहे. शनिवारी (दि. ३) येथील शासकीय रक्त केंद्रात ए-पॉझिटिव्ह ग्रुपच्या २८, ए-निगेटिव्ह ग्रुपची १, बी-पॉझिटिव्ह ग्रुपच्या ५०, बी-निगेटिव्ह ग्रुपच्या ३, ओ-पॉझिटिव्ह ग्रुपच्या ७५, ओ-निगेटव्ह ग्रुपच्या १, एबी-पॉझिटिव्ह ग्रुपच्या १२ तर एबी-निगेटिव्ह ग्रुपची १ रक्त पिशवी आहे. हा साठा येत्या आठवडाभर पुरेल एवढाच आहे.
-----------------------------
लोकमान्य ब्लड बँक
लसीकरण जोमात सुरू असून यामध्ये रक्तदान करणारा मुख्य गट येत असल्याने रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. आता २३ पिशव्याच शिल्लक असून, हा फक्त २ दिवसांचा साठा आहे. लस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. अशात रक्तदात्यांनी रक्तदान करूनच लस घेण्याची गरज आहे.
--------------------------
लस घेण्यापूूर्वी करा रक्तदान
लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. यामुळे रक्तदात्यांची संख्या घटत असून रक्त केंद्रांतही रक्ताचा साठा कमी होत चालला आहे. अशात गरजूंना रक्त मिळाले नाही, तर त्यांच्या जीवाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. रक्तदान हे जीवदान असल्याने नागरिकांनी हा विचार करून लस घेण्यापूर्वी रक्तदान करून जीवदानाच्या या पवित्र कामात हातभार लावावा, असा संदेश नियमितपणे रक्तदान करणाऱ्या व गरजूंसाठी धावून जाणाऱ्या तरुण शुभम मधुकर निपाणे याने दिला आहे.
---------------------------