शेंडा (कोयलारी) : शिवाजी राजांनी आपल्या आयुष्यात महिलांचा आदर केला. त्यांच्या कारभारात महिलांना विशेष मानसन्मान मिळत होता. त्यांच्या राजदरबारात कधीही नृत्यांगणा दिसल्या नाहीत. परस्त्रीला ते मातेसमान मानत होते. माता जिजाऊंनी बालपणापासूनच त्यांच्यावर सुसंस्कार केले होते. शिवरायांनी जगाला स्वराज्याचा विचार दिला. त्यात बलिदान आणि मातृत्वाचा आदर हा विचार राष्ट्र उभारणीसाठी आजही कामी येत आहे. असा शिवाजी राजा माताच घराघरात घडवू शकते असे प्रतिपादन प्राचार्य एच.के. किरणापुरे यांनी केले.
शासकीय आश्रम शाळेच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सभारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.ए.डब्ल्यू.भुरे, अधीक्षक पानपाटील, अधीक्षिका कांबळे व शिक्षक खेडकर उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्रमाता माँ जिजाऊ व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रांचे विधिवत पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमस्थळी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक खेडकर यांनी केले तर आभार शिक्षिका शेंडे यांनी मानले.