लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र शासनाने अनुदानित सिलिंडरवर सबसीडी देत त्याचा लाभ थेट ग्राहकाच्या बॅंक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला गॅस सिलिंडरचे दर देखील अधिक होते. त्यामुळे दोनशे ते अडीशे रुपये सबसिडी जमा होत होती. आता गॅस सिलिंडरची किमत ६६४ रुपये असून त्यावर ४६ रुपयांची सबसिडी ग्राहकांच्या बॅंक खात्यावर जमा केली जात आहे. सबसीडी देण्यापूर्वी केवळ ३५० रुपयांना गॅस सिलिंडर मिळत होता. मात्र केंद्र शासनाने सबसिडीच्या नावावर गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. ग्राहकांना प्रती गॅस सिलिंडर मागे अनुदान दिले जात असले तरी किमत वाढली असल्याने सबसिडीच स्वरुपात मिळणारी रक्कम फारच अल्प असून त्याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. गॅस सिलिंडरच्या दरामध्ये दर महिन्याला चढउतार होत असल्याने गृहिणीचे बजेट सुध्दा बिगडत चालले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने गॅस सिलिंडरवर सबसीडी देण्याऐवजी पूर्वी प्रमाणेच गॅस सिलिंडरचे दर निश्चित करावे असा सूर देखील आता सर्वसामान्य ग्राहकांमध्ये उमटत आहे.
घरपोच डिलिव्हरीसाठी १५ रुपये अतिरिक्त जिल्ह्यातील गॅस वितरकांकडून घरपोच सिलिंडर पोहचविण्यासाठी १० ते १५ रुपये ग्राहकांकडून वसूल केले जातात. नियमानुसार हे पैसे घेता येत नाही. काही ग्राहकांनी यावर आक्षेप घेतल्यास पैसे घेणे टाळले जाते.
गॅस सिलिंडरच्या दरामध्ये नेहमी बदल होत असतो. तर सबसीडीची रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केली जात आहे. ग्राहकांच्या घरापर्यंत सिलिंडर पोहचवून देणे ही वितरकाची जबाबदारी आहे. यासाठी कुठले शुल्क आकारता येत नाही. - देविदास वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी
सबसीडी देण्याच्या नावावर शासनाकडून ग्राहकांना भुर्दंड बसविला जात आहे. सुरुवातीला ३५० रुपयाला मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता ६६५ रुपये माेजावे लागत आहे. त्यामुळे शासनाने यावर विचार करुन गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याची गरज आहे. - संजय वानखेडे, ग्राहक