अनील सोले : ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन व वनविभागाने काढली वृक्षदिंडी लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : देश व राज्यातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगक्रांतीमुळे आमचे जीवन कठीण झाले आहे. तेथेच मोठ्या संख्येत झाडांच्या घटमुळे पर्यावरण संतुलन ढासळत चालले आहे. आम्हाला मानवी जीवन सुरक्षीत ठेवायचे असेल तर धरती मातेच्या रक्षणासाठी वृक्षारोपण हाच संकल्प घेतला पाहिजे असे प्रतिपादन ग्रीन अर्थ आॅर्गनायजेशनचे अध्यक्ष प्रा.आमदार अनील सोले यांनी केले. शनिवारी (दि.२४) ग्रीन अर्थ आॅर्गनायजेशन व वनविभागाच्या संयुक्तवतीने येथील जयस्तंभ चौकात आयोजीत वृक्षदिंडी यात्रेच्या वनमहोत्सव कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ.परिणय फुके, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, ग्रीन अर्थ आॅर्गनायजेशनचे सचिव प्रशांत कांबडे, डीएफओ एस.युवराज, सहा. उपवनसंरक्षक यु.टी.बिसेन, सहायक वन संरक्षक एन.एस.शेंडे, आरएफओ जायस्वाल, नेतराम कटरे, भाऊराव उके, संतोष चव्हाण, संजय कुलकर्णी, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, शहर अध्यक्ष सुनील केलनका, नगरसेवक भरत क्षत्रीय उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार सोले यांनी, महाराष्ट्र राज्याला हरीत महाराष्ट्र बनविण्यासाठी मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संकल्प घेऊन दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प घेतला होता. यांतर्गत एकाच दिवसात राज्यात दोन कोटी ८२ लाख वृक्ष लावून अभियानाची लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करविली होती. यंदा ग्रीन अर्थ आॅर्गनायजेशनच्या माध्यमातून नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा व चंद्रपूरमध्ये वृक्ष लागवडीचा संकल्प घेऊन २२ ते ३० जून पर्यंत वृक्ष दिंडी काढून लोकांना प्रोत्साहीत केले जात असल्याचे सांगीतले. तसेच १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव २०१७ साजरा केला जात असून राज्य सरकारने चार कोटी तर गोंदिया जिल्ह्याने साडे बारा लाख वृक्ष लागवडीचा संकल्प घेतल्याचे सांगीतले.
धरती मातेच्या रक्षणासाठी एकच संकल्प ‘वृक्षारोपण’
By admin | Published: June 26, 2017 12:16 AM