कपिल केकत
गोंदिया : नगर परिषदेच्या निवडणुकीत यंदा एका प्रभागात एकच सदस्य राहणार, अशा चर्चा सुरू होत्या व त्यानुसार इच्छुकांनी आपली तयारी सुरू केल्याचे दिसून येत होते. मात्र, नगर परिषदेच्या निवडणुकांत दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीच राहणार, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. परिणामी गोंदिया नगर परिषदेत मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एका प्रभागात दोन सदस्य, यानुसार निवडणूक घेतली जाणार आहे. गोंदिया नगर परिषदेत सध्या २१ प्रभागांतून मागील निवडणूक घेण्यात आली आहे. मात्र, यंदा एका प्रभागात एक सदस्य राहणार. म्हणजेच, प्रभाग लहान होणार असा समज बाळगून इच्छुकांना निवडणुकीचे डोहाळे लागल्याचे दिसून येत होते. इच्छुकांनी आतापासूनच आपली तयारी सुरू केल्याचेही दिसून येत होते. मात्र, ऐनवेळी मंत्रिमंडळाच्या या निर्णयाने कित्येकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.
-------------------------------------
पालिकेतील सध्याची स्थिती
नगर परिषदेत सध्या दोन सदस्यीय प्रभाग असून, त्यानुसार शहरात २१ प्रभागात ४२ सदस्य निवडून आले आहेत, तर ४ सदस्य मनोनित आहेत. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आले आहेत. सध्या नगराध्यक्ष व सदस्य संख्येच्या आधारे भारतीय जनता पक्षाची नगर परिषदेत सत्ता आहे.
-------------------------------
आता अशी असेल स्थिती
आतापर्यंत एक सदस्यीय प्रभागाबाबत चर्चा सुरू होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता याला विराम लागणार. त्यामुळे यंदाची निवडणूकही दोन सदस्यीय प्रभाग पध्दतीनेच घेतली जाणार असून, त्यात काही बदल होणार नाही.
-------------------------
एका मतदाराला दोघांना द्यावे लागणार मत
नगर परिषदेची मागील निवडणूक दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच घेण्यात आली होती. तेव्हा मतदारांना दोन उमेदवारांना मत द्यावे लागले होते. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आता तीच पद्धत राहणार असल्याने येणाऱ्या निवडणुकीत एका मतदाराला दोन उमेदवारांना मत द्यावे लागेल.
------------------------
नवा प्रयोग नाहीच
मागील निवडणूक दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच घेण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रयोग शहरावासीयांसाठी नवा राहिला नाही. दोन्ही सदस्यांनी आपसी समजुतीने काम करण्याची गरज आहे.
- सुभाष निनावे
----------------------
हाच प्रयोग मागील निवडणुकीतही दिसून आला असल्याने शहरवासीयांना काही नवे नाही. फक्त निवडून आलेल्या दोन्ही सदस्यांनी नागरिकांची कामे करावीत, एवढीच अपेक्षा असते. मिळून काम केल्यास प्रभागाचा विकास होणार, यात शंका नाही.
- सुरेंद्र बंसोड
------------------------
विकासकामे जलदगतीने होतील
चांगला प्रयोग असून, प्रभागात दोन सदस्य असल्यास व त्यांनी सामंजस्याने कामे केल्यास प्रभागाचा विकास होणार. प्रभाग मोठे असून, एकच सदस्य असल्याने एकट्यावरच भार येतो. मात्र, दोन सदस्य मिळून कामे करतील, तर नागरिकांची कामे करताना सोयीचे होईल.
-केशव मानकर, जिल्हाध्यक्ष, भाजप.
---------------------------------
आता एका प्रभागातून दोन सदस्य राहणार असल्याने प्रभाग मोठे राहणार. परिणामी उमेदवारांना निवडणुकीसाठी पैसाही जास्त लागणार व सामान्यांसाठी निवडणूक लढणे कठीण होईल. शिवाय वेगवेगळ्या पक्षांचे सदस्य निवडून आल्यास तेथे काम व श्रेयावरून राजकारण पेटणार. त्यामुळे एक सदस्यीय पध्दतच चांगली होती.
- ॲड. एन. डी. किरसान, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पक्ष
-----------------------------
मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय योग्य असून या निर्णयामुळे एकतर उमेदवारांची गर्दी होणार नाही. शिवाय काम करणारी व्यक्ती कसेही काम करते. यामुळे त्याला नागरिक पसंती देणार. दोन सदस्य असल्यास व दोघांनी मिळून कामे केल्यास प्रभागाचा विकास होईल. नागरिकांची कामेही लवकर होतील व अडचण येणार नाही.
- पंकज यादव, जिल्हाप्रमुख, शिवसेना
--------------------------------
मंत्रिमंडळाचा निर्णय योग्य असून, आता एका प्रभागात दोन सदस्य राहिल्यास एकावरच पूर्ण भार येणार नाही. दोघांनी मिळून काम केल्यास प्रभागाचा विकास करता येईल व नागरिकांच्या समस्या सोडविता येतील. दोन सदस्य आपापल्यापरीने प्रभागासाठी कामे करतील.
- विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, गोंदिया