गोंदिया : देवरी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांचेच पद रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, कामे खोळंबली आहेत. नागरिकांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. तहसील कार्यालयातील तहसीलदारांचा प्रभार नायब तहसीलदार सांभाळीत आहेत. येथे कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
तालुका विविध गौण खनिज संपत्तीने भरलेला आहे. मात्र या खनिजांचे रक्षण करणारे महसूल विभागाचे अधिकारीच नसल्याने अवैधरीत्या गौण खनिजांची तस्करी करणाऱ्यांची मज्जाच मज्जा असल्याने सर्वत्र चर्चेला ऊत आला आहे. या सर्व बाबींकडे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी लक्ष वेधून देवरी तहसील कार्यालयातील व अप्पर तहसील कार्यालय चिचगड येथील सर्व अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे.
तहसील कार्यालयातील दोन्ही अधिकारी दिवसभर नागरिकांची कामे करीत असून, कार्यालयातील कामाच्या अतिताणामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. देवरी तालुक्यात ५५ ग्रामपंचायती असून, विविध गावांतील जनता आपल्या कामासाठी तहसील कार्यालयात येतात. महसुली कामे यासह शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारे विविध दाखले या सर्व बाबींसाठी महत्त्वाचे असलेले तहसीलदार पद गेल्या ८४ दिवसांपासून रिक्त असल्याने प्रभारी नायब तहसीलदारांच्या खांद्यावर तहसीलदार पद व कामांचा ताण वाढत असून, दिवसभर ताटकळत उभे रहावे लागत आहे. तालुक्यात एक तहसील कार्यालय व अप्पर तहसील कार्यालय असून, फक्त दोनच अधिकारी असल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. ककोडीसारख्या दुर्गम भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात येऊन वेळ वाया घालवावा लागत आहे.
लोतप्रतिनिधींचे दुर्लक्ष
याअगोदर तहसील कार्यालयातील इतके पद कधीच रिक्त नव्हते. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्याने नागरिकांच्या भावनांशी खेळून लोकप्रतिनिधींना आता सर्वसामान्यांच्या कामांबाबत लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. लोकप्रतिनिधी किती अकार्यक्षम ठरत आहेत यांचे उदाहरण आहे. २-३ महिने रिक्त असलेले तहसीलदारांचे पद व तालुक्यातील दोन्ही कार्यालयांतील रिक्त पदे आपल्या मतदारसंघातील या प्रश्नांबाबात कोणतीही कल्पना नाही का ? अशा प्रश्न तालुकावासीयांनी उपस्थित केला आहे.
देवरी तहसील कार्यालयातील वाढती कामे प्रभारी अधिकाऱ्यांवर पडत असून, जमिनीचे दावे, शालेय दाखले, गौण खनिज आदी विविध विषयांसह जिल्हा मुख्यालयातील बैठका या सर्वच वाढत्या कामामुळे लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी लक्ष वेधून ही सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे.