लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शुभारंभ लोटून आता महिना होत असतानाच येथील रक्त केंद्राला प्लाझ्मा डोनर्स काही मिळेना असे दिसून येत आहे. आतापर्यंत फक्त ५ डोनर्सनी प्लाझ्मा डोनेट केला असून त्यांच्यापासून मिळालेल्या १० बॅग्सपॅकी ८ बॅग्स रुग्णांना वितरित करण्यात आल्या आहेत. परिणामी आता फक्त २ बॅग्स रक्त केंद्रात शिल्लक असून अशात गंभीर रुग्णांना प्लाझ्माची गरज पडल्यास मात्र त्यांची मागणी पूर्ण करता येणार नाही अशी स्थिती दिसून येत आहे. यावरून जिल्ह्यात प्लाझ्मा डोनर्सची वानवा दिसून येत असून यामुळे ५ चा आकडा काही पुढे वाढलेला नाही. कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा जीवदायी ठरत आहे. यामुळेच चांगलेच प्रयत्न करून जिल्ह्यात प्लाझ्मा युनिटला मंजुरी मिळविण्यात आली. ७ डिसेंबर रोजी येथील शासकीय रक्त केंद्रात प्लाझ्मा युनिटचा शुभारंभ झाला व त्यानंतर आतापर्यंत फक्त ५ डोनर्सनीच त्यांचे प्लाझ्मा रक्त केंद्रात डोनेट केले आहेत. त्यानंतर मात्र ५ चा हा आकडा आता प्लाझ्मा युनिटला महिना होत असतानाही काही पुढे जात नसल्याचे दिसत आहे. या ५ डोनर्सकडून रक्त केंद्राला १० बॅग्स प्लाझ्मा मिळाला असून त्यातील ८ बॅग्स गंभीर रुग्णांसाठी वितरित करण्यात आल्या आहेत. तर आता रक्त केंद्रात फक्त २ बॅग्स शिल्लक आहेत. विशेष म्हणजे, प्लाझ्मामुळे गंभीर रुग्णाला जीवदान देता येत असल्याचे दिसून आल्याने प्लाझ्माची मागणी वाढत आहे. गोंदियात प्लाझ्मा युनिट नसताना येथील नागरिकांना प्लाझ्मासाठी नागपूरला धाव घ्यावी लागत होती. तेव्हा प्लाझ्मा युनिट गोंदियात सुरू करावे, अशी मागणी केली जात होती. मात्र आता प्लाझ्मा युनिट गोंदियात आले असताना त्यात प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी कोरोनामुक्त रुग्ण पुढाकार घेत नसल्याने प्लाझ्मा युनिटकडून प्लाझ्माची पूर्तता करता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनामुक्त रुग्णांच्या पुढाकाराची गरज रक्तदान हेच जीवदान असतानाच कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांसाठी प्लाझ्मा दान हेच जीवदान ठरत आहे. विशेष म्हणजे, प्लाझ्मा डोनेट केल्यानंतर त्याचे शरीरावर काहीच अपाय नसून एखादी व्यक्ती १५ दिवसांनी पुन्हा प्लाझ्मा डोनेट करू शकते. मात्र कोरोनामुक्त झालेल्यांकडून प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याने रक्त केंद्रात फक्त २ बॅग्स शिल्लक आहेत. अशात यापेक्षा जास्त रुग्णांना प्लाझ्माची गरज पडल्यास मात्र कठीण परिस्थिती निर्माण होणार यात शंका नाही. करिता कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.