बोंडगावदेवी : आजघडीला महिलांनी स्वत:मधील न्यूनगंड बाजूला ठेवावा. घरातील चुल आणि मुलाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून सामाजिक जीवनात सहभागी व्हावे. प्रत्येक नारी शक्तीने स्वत:ला कमी लेखून अबला समजू नये. नकारात्मक विचारांना तिलांजली देऊन सकारात्मक विचार अंगी बाळगल्यास यशोशिखर गाठणे शक्य आहे. येणारे संकट व आव्हान पेलण्याची किमया समर्थपणे महिलाच करु शकते असे प्रतिपादन येथील सरपंच प्रतिमा बोरकर यांनी केले.
येथील ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चान्ना प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी व पोलीस पाटील मंगला रामटेके उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उषा पुस्तोळे, माया मेश्राम, निराशा मेश्राम, अंगणवाडी सेविका भामीना नेटीनकर, किरण खोब्रागडे, रिता मानकर, वर्षा राखडे, माजी ग्रा.पं.सदस्य दीपिका गजभिये, सुनंदा कोटरंगे, डॉ. नेवारे, ॲड. श्रीकांत बनपुरकर, अमरचंद ठवरे, ग्राविअ पी.एम.समरीत उपस्थित होते.
सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रामोर दीप प्रज्वलन व पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कर्तव्यातील महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. निराशा मेश्राम यांनी कविता सादर करुन महिला शक्तीचा गुणगौरव केला. उषा पुस्तोळे, बनपूरकर, ठवरे यांनी सुध्दा विचार व्यक्त केले. संचालन करुन आभार माया मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी कर्मचारी राष्ट्रपाल ठवरे, भोजराज मेश्राम व विश्वास लोणारे यांनी सहकार्य केले.