गोंदिया : जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला असून, कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोनवर आली आहे. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसात जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवारी (दि. १०) जिल्ह्यात बाधित आणि मात करणाऱ्यांची संख्या शून्यच होती. त्यामुळे जिल्हावासीयांच्या दृष्टीने ही बाब समाधानकारक आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी ३७९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २९० नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ८९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. मागील दहा दिवसात केवळ एका कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना जिल्ह्यातून आता पूर्णपणे हद्दपार होत असल्याचे चित्र आहे. मात्र यानंतरही जिल्हावासीयांना पूर्वीइतकीच काळजी घ्यावी लागणार आहे. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४,३९,७९८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २,२१,६८५ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २,१८,११३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे. यापैकी ४१,१९४ नमुने निगेटिव्ह आले आहे, तर ४०,४८९ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
.............
दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा यादी लांबली
जिल्ह्यातील १९४ केंद्रांवरून सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. यांतर्गत आतापर्यंत ६,४२,२५६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ५,०३,२५४ नागरिकांना पहिला डोस, तर १,३९,००२ नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. त्यामुळे जवळपास पाच लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.