तिरोडा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील बंद असलेला बाह्य रुग्ण तपासणी विभाग (ओपीडी) आज, गुरुवारपासून पूर्ववत सुरू करण्यात येईल तसेच बंद असलेल्या इतर आरोग्यविषयक सोयी-सुविधा सुद्धा पूर्ववत करण्यात येतील, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी अजय नाष्टे यांनी तिरोडा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
महिनाभरापूर्वी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. मात्र, त्यासाठी कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचे सांगत इतर रुग्णसुविधा बंद करण्यात आल्या. याला महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लोटला असून, आता येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये केवळ ५ रुग्ण आहेत. ही बाब तिरोडा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी अजय नाष्टे याच्यांसोबत चर्चा करून लक्षात आणून दिली. त्यावर त्यांनी त्वरित आदेश काढून २० मे पासून ओपीडी सुरू करण्याचे आदेश उपजिल्हा रुग्णालयाला दिले. गरोदर महिलांची तपासणी, सोनोग्राफी, प्रसूती, सिझर, दैनिक ओपीडी, आंतर रुग्ण विभाग या सेवासुद्धा पूर्ववत सुरू करण्यात येतील. रुग्णांची गैरसोय लक्षात घेता तिरोडा पत्रकार संघाने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.