गोंदिया : शासन मान्यताप्राप्त वैद्यकीय परवाना नसताना (विना रजिस्ट्रेशन) गोरेगाव येथे हॉस्पिटल चालविणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर गुरूवारी (दि. २१) कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात गोरेगाव पोलिस व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी केली आहे. नितेश बाजपेयी असे बोगस डॉक्टरचे नाव आहे.गुरूवारी (दि. २१) गोरेगाव येथील वैद्यकीय अधीक्षक यांनी गोरेगावात बोगस डॉक्टर औषधोपचार करत असल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मोहबे यांच्याकडे केली होती. त्या बोगस डॉक्टरकडे कुठलाही शासन मान्यताप्राप्त वैद्यकीय परवाना नसताना (विना रजिस्ट्रेशन) तो हॉस्पिटल चालवत होता. यावर डॉ. मोहबे यांनी ही माहिती पोलिस अधीक्षक पिंगळे यांना देऊन कारवाईसाठी मदत करण्याची विनंती केली. पिंगळे यांनी आपले पोलिस पाठवून शल्य चिकित्सक डॉ. मोहबे, वैद्यकीय अधीक्षक गोरेगाव यांच्यासह गोरेगाव येथील डॉ. नितेश बाजपेयी याच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचून परवान्याबाबत विचारले. त्याठिकाणी असलेल्या नर्स स्टाफकडून कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याबाबत सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली.या हॉस्पिटलमध्ये एक महिला दाखल होती. तिच्यावर विना पात्रताधारक डॉक्टरद्वारे (बोगस डॉक्टरद्वारे) औषधोपचार सुरू होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन नव्हते. परिणामी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय पटले यांनी रितसर कारवाई केली असून, यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट १९६१ चे कलम ३३ (२)(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक भुसारी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सुजित घोलप करत आहेत.
विना रजिस्ट्रेशन दवाखाना उघडला, उपचार करू लागला! गुन्हा नोंदवला
By अंकुश गुंडावार | Published: March 22, 2024 4:52 PM