गोंदिया : सागरिका गोल्ड, मायाक्रोला, सल्फा मॅक्स, झिंक अशा पूरक खतांना भरारी पथकामार्फत विक्री बंद आदेश दिले असून, या खतांची किंमत ३६ लाख २८ हजार रूपये आहे. कृषी केंद्र संचालक आणि शेतकरी लिंकिंगमुळे त्रस्त झाल्याची ओरड वाढल्यानंतर कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, या कारवाईने खते विक्रेत्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू असून, या दरम्यान खत विक्रेत्या कंपन्यांकडून पूरक खते (लिंकिंग) घेण्यासाठी कृषी केंद्र संचालकांवर दबाव टाकला जात होता, तर शेतकऱ्यांनासुद्धा ज्या खताची गरज नाही ती खते घ्यावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. खत विक्रेत्या कंपन्यांकडून लिंकिंगसाठी सक्ती केली जात असल्याने कृषी केंद्र संचालकांनी वैतागून १८ जुलैपासून खते विक्री पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यासंबंधीचे निवेदनसुद्धा जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाला दिले होते. कृषी केंद्र धारकांना लिंकिंग करून खते विक्री करू नये असे आदेश देण्यात आले. खत विक्रेत्या कंपन्यांना लिंकिंग न करण्याचे आदेश देण्यात आले. कृषी केंद्रधारक व कंपनी यांनी खताची लिंकिंग न करण्याचे मान्य केले असून, किरकोळ व घाऊक विक्रेते यांचे समाधान झाल्याने बेमुदत संप मागे घेतला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले.
तीन दिवस राबविले तपासणी अभियान
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत १३ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व गुणवत्ता निरीक्षक यांना रासायनिक खतासह इतर खते लिंकिंगबाबत कृषी केंद्र व गोडावून तपासणीचे आदेशित केलेले होते. त्यानुसार १४ ते १७ जुलैपर्यंत जिल्हा व तालुका स्तरावरील भरारी पथकामार्फत रेल्वे रॅक पॉईंट गोंदिया तसेच घाऊक व किरकोळ खत विक्री केंद्रे तपासणी केली. तपासणीदरम्यान जिल्हास्तरीय भरारी पथकामार्फत रेल्वे रॅक पॉईंट गोंदिया येथे तपासणी झाली.
...तर होणार कारवाई
सागरिका गोल्ड, मायाक्रोला, सल्फा मॅक्स, झिंक अशा पूरक खतांना भरारी पथकामार्फत विक्री बंद आदेश दिले आहेत. कृषी केंद्र धारकांना लिंकिंग करून खते विक्री करू नये असे आदेश देण्यात आले असून, लिंकिंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी सूचना करण्यात आली.
युरिया खतासह दिलेली पूरक खते परत घेणार
जि. प. कृषी सभापती कुथे यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी विकास अधिकारी मळामे, डिस्ट्रिक्ट क्वालिटी कंट्रोलर बावणकर, कृषी केंद्र व्यापारी संघटना अध्यक्ष मुकेश अग्रवाल, ठोक व्यापारी रिंकू सिंघानिया, सर्व जिल्हा विकास कृषी अधिकारी, सर्व कृषी केंद्र ठोक व्यापारी, सर्व किरकोळ व्यापारी व खत निर्माता कंपन्यांचे विक्री प्रतिनिधी यांची संयुक्त सभा जिल्हा परिषद सभागृहात घेतली. सभेमध्ये सर्व कंपनीच्या प्रतिनिधींनी युरिया खतासोबत किंवा इतर खतासोबत लिंकिंगची प्रक्रिया रद्द करून आतापर्यंत दिलेली लिंकिंगची खते व औषधे परत घेण्याचे कबूल केले. त्यामुळे संप मागे घेत असल्याची माहिती रेखलाल टेंभरे यांनी दिली.