कृषी अधिकारी तुमडाम : सेंद्रीय शेती शेतकरी प्रशिक्षण बोंडगावदेवी : आजघडीला शेतीमधून पिकाचे उत्पादन घेताना मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा व किटकनाशक औषधांचा वापर केला जातो. यापासून उत्पादनात जरी वाढ होत असली तरी मात्र त्याप्रमाणात हातामध्ये पैसा येत नाही. उत्पादीत मालाच्या आहारापासून मानवी जीवनाला अनेक व्याधीला सामोरा जावे लागते, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले. कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रीय शेती शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. येथील स्वर्गीय सुनिल बहुउद्देशिय स्वयंसहायता शेतकरी बचत गटाच्या वतीने प्रगतशील शेतकरी कुसन झोळे यांच्या शेडनेट असलेल्या शेतामध्ये आयोजित ५० शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम होते. ते पुढे म्हणाले, पुढील आयुष्य निरोगी सुखकर जाण्याबरोबरच जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी सेंद्रीय शेतीकरुन पिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधवानी आता पुढे येणे काळाची गरज आहे.मार्गदर्शक म्हणूनकृषी मंडळ अधिकारी संजय रामटेके, अर्जुनी-मोरगावचे मंडळ कृषी अधिकारी नंदकुमार मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक ऋषी चांदेवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे उपस्थित होते. याप्रसंगीे सरपंच राधेशाम झोळे, माजी पं.स.सदस्य प्रमोद पाऊलझगडे, तंमुस अध्यक्ष तुळशीदास बोरकर, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर बोरकर उपस्थित होते. येथील ५० पुरुष, महिला शेतकऱ्यांच्या समूहाने तयार केलेल्या गटाची सेंद्रीय शेती प्रकल्पासाठी निवड केली. ५० शेतकऱ्यांच्या गटास प्रशिक्षण देण्यासाठी कुसन झोळे यांच्या बांध्यावर मार्गदर्शन करण्यात आले. (वार्ताहर)
सेंद्रीय शेती लाभप्रद व आरोग्यवर्धक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2017 1:00 AM