आमगाव : बिरसी विमानतळाला जोडणाऱ्या आमगाव-कामठा-रावणवाडी मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रारी, निवेदन देऊनही प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग येत नाही ताेपर्यंत आंदोलन करणार, असा इशारा कामठा मार्ग संघर्ष समितीने दिला आहे. यासाठी समितीच्यावतीने शुक्रवारी (दि.२३) तहसीलदारांमार्फत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
जिल्हातील बिरसी विमानतळाकडे जाणाऱ्या आमगाव- कामठा -रावणवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खड्डयांमुळे अनेकांना अपंगत्व आले असून काहींचा जीवही गेला आहे. रस्त्याच्या नवीनीकरणासाठी आमदार, खासदार, अन्य राजकीय मंडळी तसेच प्रशासनाला वेळोवेळी रस्त्याच्या दुरावस्थेची व त्यामुळे घडलेल्या घटनांची माहिती देऊन सुद्धा सर्व बाजुने दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या परिसरातील २५ गावातील नागरिकांनी कामठा मार्ग संघर्ष समितीचे गठण करुन रस्ता नवीनीकरणासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
यांतर्गत समिती सदस्यांनी शुक्रवारी (दि.२३) तहसीलदारांमार्फत सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. यावेळी कामठा मार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव चूटे, आर. एस. पटले, दिनेश कावळे, सागर चूटे, राजीव फुंडे, अमोल मेंढे, मदन चौरागडे, मेघश्याम मोटघरे, मुरली भुते, प्रवीण मेंढे, विकास बोहरे, महेंद्र राहंगडाले, महेंद्र फरकुंडे, मनोज गौतम, दुर्गेश गौतम, प्रदीप खोटेले, रंजित टेंभुर्णीकर, योगेश गौतम, नरेंद्र बागडे, सागर वैद्य तसेच कामठा मार्ग संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
-------------------------------
मंत्र्यांचे फोटो घेऊन डबक्यांत बसणार
रस्ता दुरूस्तीसाठी कित्येकदा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना बोलूनही काहीच फायदा झाला नाही. अशात २५ गावांतील संतप्त नागरिकांनी गठीत केलेल्या कामठा मार्ग संघर्ष समितीने येत्या २ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार व रस्त्यावरील डबक्यात लोकप्रतिनिधी व मंत्र्यांचे फोटो घेऊन समिती सदस्य बसणार आहेत.