गोंदिया : मध्यंतरी लसींचा तुटवडा असल्याने कित्येकदा लसीकरणाला ब्रेक द्यावा लागला. मात्र, मागील काही दिवसांपासून नियमित पुरवठा होत असल्याने लसीकरणाला गती आली होती. अशात आता जिल्ह्यात २५०० डोस उपलब्ध असून, त्यातून गुरुवारी (दि.२२) लसीकरण करता येणार आहे. मात्र, लसींचा पुरवठा न झाल्यास शुक्रवारी (दि.२३) पुन्हा लसीकरणाला ब्रेक द्यावा लागणार असल्याची स्थिती दिसून येत आहे.
१६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर नियमितपणे लसींचा पुरवठा होत असून, यामुळे आतापर्यंत लसीकरण सुरळीत सुरू होते. मात्र, देशात १८-४४ गटाच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आल्यानंतर तरुणाई लसीकरणासाठी सरसावली असून, यामुळे लसीकरणाला चांगलीच गती आली आहे. परिणामी लसींचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात सध्या हाच प्रकार सुरू असून, मागील काही दिवस लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरणाला कित्येकदा ब्रेक द्यावा लागला.
मात्र, मध्यंतरी लसींचा पुरवठा नियमितपणे होऊ लागल्याने लसीकरण सुरळीत सुरू होते व आतापर्यंत जिल्ह्यातील ५४३८४६ नागरिकांचे लसीकरण आटोपले आहे. असे असतानाच आता जिल्ह्यात सुमारे २५०० डोस उपलब्ध आहेत. त्यात बुधवारी (दि.२१) बकरी ईदची सुटी आल्याने लसीकरण झाले नाही. त्यामुळे उपलब्ध लसींतून गुरुवारी (दि.२२) लसीकरण करता येणार आहे. मात्र, गुरुवारी लसींचा पुरवठा न झाल्यास शुक्रवारी (दि.२३) लसीकरणाला ब्रेक द्यावा लागणार असे दिसत आहे.
-----------------------------
लसीकरणातील खंडामुळे टक्केवारीवर परिणाम
जिल्ह्यात आतापर्यंत ५४३८४६ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्याची टक्केवारी ४१ च्या वर गेली आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने कित्येकदा जिल्ह्यात लसीकरण बंद पडले होते. याचा परिणाम लसीकरणाच्या टक्केवारीवर पडला आहे. अन्यथा यापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले असते, यात शंका नाही.
-----------------------------
आठवडाभरात गाठणार ५० टक्क्यांचा टप्पा
जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी ४१ टक्क्यांवर गेली आहे. त्यात नियमितपणे लसींचा पुरवठा होत राहिल्यास ही टक्केवारी नक्कीच वाढणार आहे. सध्या लसीकरणाला घेऊन नागरिक गंभीर दिसत असून, ते पुढे येत असल्याचे दिसत आहे. अशात येत्या आठवडाभरात लसीकरण ५० टक्क्यांचा टप्पा गाठणार असे दिसून येत आहे.