गोरेगाव : कोरोनामुळे सर्व सांस्कृतिक, कला व साहित्य कार्यक्रम बंद असल्याने परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. अशात परवानगी देण्यात यावी व कार्यक्रम बंद असल्यामुळे कोरोनाकाळातील मानधन देण्यात यावे, अशी मागणी कलावंतांनी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर संगीतमय मोर्चा काढण्याचा निर्णय प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटनेने घेतला आहे.
शहरातील के.पी. सभागृहात रविवारी (दि.१२) तालुक्यातील प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत लोककलावंत, प्रबोधनकार, वादक, नाट्य कलावंत, कलापथक, तमाशा, दंडार, भजन, गोंधळ, डान्स हंगामा, लावणी, कीर्तनकार उपस्थित होते. सभेत लॉकडाऊननंतर आता सर्व काही खुले होत असतानाच सांस्कृतिक कार्यक्रम का नाही, असा सवाल कलावंतांनी उपस्थित केला. तसेच सर्व सांस्कृतिक कार्यक्रम खुल्या पटांगणात सुरू करण्याकरिता परवानगी देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. सभेला संघटनेचे तालुकाध्यक्ष आदेश थुलकर, उपाध्यक्ष राकेश अगडे, सचिव नितीन साखरे, महासचिव टोलीराम पारधी, चेतन येळे, डॉ. विलास बडोले, प्रभूदास गौंधर्य, प्रकाश पचंभाई, रामेश्वर बोपचे, रामू शिल्लेवार, निशांत खोब्रागडे, सुभाष पटले यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.