गोंदिया : बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना, मागेल त्याला १०० दिवस काम देण्यासाठी शासनाकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी रोजगार हमी योजना चालविली जाते. परंतु या योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या होत नाही. त्यामुळे लोकांच्या हाताला काम नाही. आजघडीला शेतात शेतकऱ्यांना शेतमजुरांना काम नाही. अशास्थितीत त्यांना काम देण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम दिले जाते. परंतु हे काम देणाऱ्या यंत्रणेच्या बड्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे ज्या जिल्ह्यात आजघडीला दोन लाख लोकांना काम द्यायला पाहिजे होते, त्याच ठिकाणी फक्त ६४ हजार मजूर कामावर आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे गोंदिया जिल्ह्यात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. गोंदिया जिल्ह्यात काम मागणारे चार लाख सहा हजार १५६ राेहयोचे जॉब कॉर्ड आहेत. परंतु या चार लाखांवरील लोकांना काम देण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत आहे. कामाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्या काम मागणाऱ्या हातांना काम दिले जात नाही. गोंदिया जिल्ह्यातील ५५९ ग्रामपंचायतींपैकी फक्त ४५४ ग्रामपंचायतींमध्ये ६४ हजार ९० मजूर कामावर आहेत. म्हणजेच, तब्बल साडेतीन लाख मजुरांच्या हाताला कामच नसल्याने ते बेरोजगार होऊन बसले आहेत.
........................
बॉक्स
तालुकानिहाय स्थिती
तालुका ग्रामपंचायती कामे सुरू असलेल्या ग्रा.पं.
आमगाव -६५- ४६- ४२६७
अर्जुनी-मोरगाव -७१- ५९- १३४०४
देवरी -५६- ४६- ८१२०
गोंदिया -१०९- ९२- ९२९७
गोरेगाव- -६५- ४८- ४६४८
सडक-अर्जुनी -६४- ५५- १११८३
सालेकसा -४३- ३५- ७५०९
तिरोडा -९५- ७३- ५६६२
एकूण -५५९- ४५४- ६४०९०
................
रोहयोचा आराखडा
जिल्ह्यात एकूण जॉबकॉर्डधारक-४०६१५६
सध्या सुरू असलेली रोहयोची कामे-५६६३
...........
सर्वात कमी रोजगार आमगाव तालुक्यात
रोजगार हमी योजनेच्या कामावर कार्यरत मजुरांची संख्या पाहता, सर्वात कमी मजूर आमगाव तालुक्यात आहेत. आमगाव तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींपैकी ४६ ग्रामपंचायतीमध्ये चार हजार २६७ मजूर कामावर आहेत. यंदा १०० दिवस काम करणारे मजूर अत्यल्पच आहेत.
कोट
कोरोनामुळे यंदा आम्हाला काम मिळाले नाही. जॉबकॉर्ड तयार केले आहे; पण हाताला काम नाही. मागेल त्याला काम म्हणून शासन मजुरांची फसवणूक करीत आहे. हाताला काम नसल्यामुळे कामाच्या प्रतीक्षेत आहोत.
- भागरथा भांडारकर, रोहयो कामगार
कोट
कोरोनामुळे हातात पैसा नाही. कामही नाही, त्यामुळे जीवन जगण्यासाठी खूप कसरत करावी लागते. शासनाने रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात करावी. कोरोनाच्या नावावर आमचा रोजगार हिरावण्याचे षड्यंत्र तर नाही ना, असे वाटत आहे. आम्हाला काम देण्यात यावे.
- रामकिशन येसनसुरे, रोहयो कामगार