लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर व रक्ताचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या लोहयुक्त गोळ्यांचा कालबाह्य झालेला साठा अर्जुनी-मोरगाव- दाभना रस्त्यावर अस्ताव्यस्त फेकण्यात आला. ही औषधी कुणी फेकली याचा शोध घेण्याचे आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान आहे.प्राप्त माहितीनुसार, गरोदर व रक्ताचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णांना शासनातर्फे लोहयुक्त औषधांचा मोफत पुरवठा केला जातो. शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुद्धा या औषधांचा पुरवठा केला जातो. मात्र पुरवठा केल्या जाणाºया औषधाचे प्रत्यक्ष वितरण केले जाते अथवा नाही याची सहनिशा यंत्रणेकडून केली जात नाही. बहुतांशी औषधांचे वितरणच होत नसल्याने या प्रकारावरुन उघड झाले आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.सिंगलटोलीच्या पुढे असलेल्या टी पार्इंटपासून अवघ्या २०० मिटर अंतरावर सागवन रोपवाटिकेनजीक या कालबाह्य झालेला गोळ्यांचा मोठा खच पडून आहे. या औषधांचा वेष्टनावर महाराष्ट्र शासनाच्या वापरासाठी तसेच विक्रीकरिता नाही असे लिहिले आहे. हिंदूस्तान लेबॉरटरीज या कंपनीने पुरवठा केलेली आयरण अॅड फोलीक अॅसिड नामक या लोहयुक्त गोळ्या आहेत. या औषधांची निर्मिती मार्च २०१६ मधील असून त्या फेबु्रवारी २०१८ मध्ये कालबाह्य झालेल्या आहेत. या औषधाच्या वेष्टनावर बॅच नं. टीएएफ ६००४ एएल असे नमूद आहे. नेमका हा साठा कुणी आणून फेकला हे अज्ञात आहे. शासनातर्फे गोरगरीब व गरजू रुग्णांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी प्रयत्न केले जातात मात्र आरोग्य यंत्रणेकडून त्याचे योग्यप्रकारे नियोजन केले जात नाही. दिलेल्या उद्दीष्टाप्रमाणे त्याचे वाटपच केले जात नाही. कालांतराने ही औषधे कालबाह्य ठरतात व ती निरुपयोगी ठरतात. अशा प्रकारामुळे शासनाच्या पैशाचा अपव्यय होतो. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन औषधे नेमकी कुणी फेकली याचा शोध घेऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.औषधे शाळेची असल्याची शक्यताकालबाह्य झालेले औषधे पुरण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात शोषखड्डे आहेत. त्यामुळे ही औषधी शासकीय रुग्णालयातील असल्याची शक्यता कमी आहे. लोहयुक्त औषधांचा शाळांनाही पुरवठा केला जातो. त्यामुळे ही औषधे शाळांतील असल्याचीच दाट शक्यता आहे. घटनास्थळावर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी पाठवून चौकशी करण्यात येईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत यांनी लोकमतशी बोलताना दिली.
कालबाह्य औषधांचा साठा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 9:30 PM
किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर व रक्ताचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या लोहयुक्त गोळ्यांचा कालबाह्य झालेला साठा अर्जुनी-मोरगाव- दाभना रस्त्यावर अस्ताव्यस्त फेकण्यात आला.
ठळक मुद्देऔषधे कुठून आली? : शोध घेण्याचे आरोग्य विभागापुढे आव्हान, दोषींवर कठोर कारवाईची गरज