गोंदिया : शहरातील एका १७ वर्षांच्या मुलीसोबत प्रेम करून गोंदियातील २१ वर्षांचा तरुण तिच्याशी चॅटिंग करीत होता. परंतु त्यांची चॅटिंग मुलीच्या आईने पकडल्याने मुलीकडील मंडळीने त्याला समज दिली. परंतु समज देण्यासाठी गेलेल्या मुलीच्या नातेवाइकांना त्या तरुणाने आत्महत्या करून फसविण्याची धमकी दिली. या धमकीला पाहून मुलीचे नातेवाईक तक्रार करण्यासाठी पोलिसात पोहोचले असता तरुणाने फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना २३ सप्टेंबरच्या सायंकाळी ५.४५ वाजता घडली.
सौरभ प्रकाश नंदेश्वर (२१, रा. मजारजवळ सिंगलटोली, गोंदिया) असे तरुणाचे नाव आहे. तो गोंदियातील एका १७ वर्षांच्या मुलीशी लगट लावून तिच्याशी चॅटिंग करीत होता. त्या दोघांची चॅटिंग मुलीच्या आईने पकडली. हा प्रकार तिने आपल्या भावाला सांगितला. मुलीच्या मामाने त्या तरुणाला यासंदर्भात विचारणा केली आणि समज दिली. परंतु त्या तरुणाने मुलीच्या घरी येऊन त्या मुलीला माझ्यासोबत बोलू न दिल्यास मी आत्महत्या करून फसवून टाकीन, अशी धमकी दिली. या धमकीमुळे मुलीच्या आईने गोंदिया शहर पोलिसात तक्रार केली. तिकडे त्या तरुणाने सायंकाळी ५.४५ वाजता फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला वेळीच उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. गोंदिया शहर पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध भादंविच्या कलम ४४८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस हवालदार प्रीतम खांबले यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.