गोंदिया : शासन निर्णयानुसार ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यासाठी शासन स्तरावरून निर्देश दिल्याप्रमाणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून तसे सर्वेक्षण करण्यात यावे. शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात यावी. त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे, असे मत अप्पर तहसीलदार अनिल खडतकर यांनी व्यक्त केले.
शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेकरिता रूपरेषा ठरविण्यासाठी स्थानिक तहसील कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. सभेला तहसीलदार आदेश डफळ, खंडविकास अधिकारी पी.डी. निर्वाण, गटशिक्षणाधिकारी जनार्दन राऊत, प्रशासन अधिकारी राणे, भोसले, पौनीकर, सोनटक्के, सहायक कामगार अधिकारी पंधरे, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सविता बेदरकर, वर्षा भांडारकर, गटसमन्वयक विनोद परतेकी, तालुका बालरक्षक अनिता ठेंगळी, केद्रप्रमुख, शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते. सभेच्या अनुषंगाने सर्वांना ५ ते १५ मार्च या कालावधीत ग्रामस्तरावर सर्वेक्षणाला सुरुवात करून तसा अहवाल रोज देण्यास सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद परतेकी यांनी केले, तर आभार अनिता ठेंगडी यांनी मानले.