गोंदिया : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांच्या अध्यक्षतेत आढावा सभा घेऊन नियोजन करण्यात आले आहे.
कोविड-१९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. ६ ते १८ वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य झाल्याचे दिसून येत आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने २३ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार विशेष शोधमोहीम राबविण्याचे ठरविले आहे. या मोहिमेनुसार ३ ते ६ वयोगटातील जी बालके एकात्मिक बालविकास योजनेचा लाभ घेत नाहीत तसेच खासगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनिअर केजी, सिनिअर केजीमध्ये जात नाहीत. ६ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालकांची शोधमोहीम ५ ते १५ मार्च २०२१ पर्यंत या कालावधीत राबवायची आहे. प्रत्येक गावासाठी लोकसंख्येनुसार एक अंगणवाडी सेविका, मदतनीस व शिक्षकांची (प्राथमिक व माध्यमिक) प्रगणक म्हणून नेमणूक करावयाची आहे. गावनिहाय सर्वेक्षणासाठी प्रगणकांचे नियोजन करण्यात आले आहे. इयत्ता ५ वी ते ८ वी तसेच ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरू असल्यामुळे ५० टक्के शिक्षकांची शोध मोहिमेकरिता नियुक्ती करण्यात आली.
शाळा बंद न ठेवता विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन प्रभावित होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. कुटुंबाची शाळाबाह्य शोधमोहीम करीत असताना अंगणवाडी सेविका, मदतनीस व शिक्षकांनी एकत्रितपणे सर्वेक्षण करणार आहेत. दैनिक आढावा जिल्हास्तरावर कळविणार आहेत. या संपूर्ण जिल्ह्याचा आढावा स्वत: प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी घेतला आहे.
------------------------
येथे शोधणार शाळाबाह्य मुले
ही शोधमोहीम बसस्थानक, वीटभट्ट्या, शेतीची रोवनी करणारे मजूर, घरकुलाचे बांधकाम करणारे मजूर, तेंदूपत्ता संकलन करणारे, अस्थायी निवारा करणारी कुटुंबे, हायवे व रस्त्यावरील बांधकाम, रेल्वेस्टेशन बाहेरील परिसर, भीक मागणारे व कचरा वेचणारी बालके, हॉटेलमध्ये काम करणारे बालमूजर या ठिकाणी राबविली जाणार आहे.